तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात असलेले प्राचीन मंकावती तीर्थकुंडाच्या ठिकाणी अवैधरित्या बांधकाम केल्याच्या प्रकरणी देवानंद साहेबराव रोचकरी आणि त्यांचे बंधू बाळासाहेब साहेबराव रोचकरी यांच्यासह अन्य आरोपींविरोधात तुळजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशी समितीच्या अहवालानंतर मंकावती तीर्थकुंड प्रकरणी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते; मात्र त्याला रोचकरी यांनी स्थगिती आणली होती. त्यानंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकरणाची सत्य स्थिती आणि प्रशासनाची बाजू ऐकल्यावर ही स्थगिती तात्काळ उठवली.
१. रोचकरी यांच्यावर मंकावती तीर्थकुंड स्वतःच्या नावावर करून हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे आणि पुरावे सिद्ध करणे, फसवणूक करणे यांसह अन्य कलमांसह गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद करत आहेत.
२. तीर्थकुंडाच्या ठिकाणी अवैध बांधकाम केल्याच्या प्रकरणात रोचकरी बंधूंना तुळजापूर भूमी अभिलेख कार्यालयासह नगर परिषद आणि अन्य कार्यालयांतील कोणकोणत्या व्यक्तींनी साहाय्य केले, याचे अन्वेषण पोलीस करणार आहेत.
३. प्राचीन श्रीविष्णु तीर्थ (मंकावती कुंड) येथे अवैधरित्या बांधकाम करणार्यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी येथील दशावतार मठाचे महंत मावजीनाथ महाराज यांच्यासह महंत इच्छागिरी महाराज, महंत व्यंकटअरण्य महाराज, संजयदादा सोनवणे, जनक कदम पाटील, सुदर्शन वाघमारे यांनी ३१ मे २०२१ या दिवशी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे.
देवानंद रोचकरी यांचा भाजप पक्षाशी दुरान्वये संबंध नाही. रोचकरी हे भाजप पक्षाच्या कोणत्याही पदावर पदाधिकारी म्हणून कार्यरत किंवा सक्रीय नसून ते पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत. त्यामुळे त्यांचा भाजपशी थेट संबंध नाही, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिली आहे.