संपादकीय
राजस्थानमधील महंदीपूर येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याचा घाट सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने घातला आहे. बालाजी मंदिराचे महंत श्री किशोर पुरी महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर सरकारने ही प्रक्रिया चालू केली आहे. या मंदिरात हनुमानाची मूर्ती आहे. श्री हनुमान हा बलसंपन्न आहे; म्हणून त्याला ‘बालाजी’ असे म्हटले जाते. हे मंदिर उत्तर भारतात प्रसिद्ध आहे. वाईट शक्तींच्या निवारणार्थ या मंदिरात अनेक भाविक प्रतिदिन दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर साधारण १ सहस्र वर्षे प्राचीन असल्याचे म्हटले जाते. या मंदिराच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात सरकारकडे म्हणे तक्रारी आल्या होत्या. त्याची नोंद घेत सरकार मंदिर कह्यात घेण्याचा विचार करत आहे. लोकांच्या तक्रारींचे निवारण करणे, जनताभिमुख कारभार करणे, हे सरकारचे कर्तव्यच असते; मात्र मंदिरातील अनागोंदी कारभाराची नोंद घेऊन त्याविषयी तत्परतेने निर्णय घेणारे काँग्रेस सरकार लोकांच्या अन्य समस्यांच्या तक्रारींचे निवारण एवढ्या तत्परतेने करते का ? काँग्रेस भारतात सर्वाधिक काळ सत्तेत होती. या काळात काँग्रेस सरकारने काय केले ? सर्वाधिक भ्रष्टाचार आणि घोटाळे याच सरकारच्या काळात समोर आले. नागरिकांना जीवनावश्यक गोष्टी पुरवण्यात हे सरकार अपयशी ठरले. असे असतांना काँग्रेस सरकारने ‘मंदिर व्यवस्थापनाविषयी तक्रारी आल्या; म्हणून कारवाई करतो’, असे सांगणे ही शुद्ध लोणकढी थाप होय. ‘आम्ही तक्रारींच्या निवारणाविषयी संवेदनशील आहोत’, असे काँग्रेस सरकार दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ महंदीपूर येथील बालाजी मंदिरच नव्हे, भारतातील विविध प्रसिद्ध मंदिरे ही त्या राज्यांच्या सरकारांच्या कह्यात आहेत. या मंदिरांच्या सरकारीकरणामुळे तेथील भाविकांना चांगल्या सुविधा मिळतात, असेही नाही. भाविकांची असुविधा होतेच, त्याही पुढे जाऊन या मंदिरांमध्ये शेकडो वर्षे चालत आलेल्या परंपरा मंदिर सरकारीकरणामुळे खंडित झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या मंदिराचे सरकारीकरण झाल्यावर तेथील सर्व परंपरा पाळल्या जाणार का ? जर अनागोंदी कारभारामुळे मंदिर कह्यात घेण्यात येत असेल, तर हाच नियम काँग्रेस किंवा अन्य पक्षांचे सरकार यांनाही लावायला हवा. जनताविरोधी निर्णय घेणारे, भ्रष्टाचारी आणि अनागोंदी कारभार करणार्या सत्ताधारी पक्षांना हटवून जनताभिमुख शासनकर्ते का बसवण्यात येत नाहीत ? ‘महंत श्री किशोर पुरी महाराज यांच्यानंतर मंदिराचा सांभाळ करणारे कुणी सक्षम नसल्यामुळे सरकार हे मंदिर कह्यात घेणार’, असेही एक कारण सरकार देत आहे. देवावर श्रद्धा ठेवून कार्य करणारे अनेक भाविक हिंदु भारतात आहेत. असे हिंदू श्रद्धा ठेवून मंदिराचे कारभार चालवू शकतात. त्यामुळे ‘महंत गेल्यामुळे मंदिर कोण चालवणार ?’ याची चिंता काँग्रेस सरकारने करू नये. मंदिराचे व्यवस्थापन चालवायला हिंदू सक्षम आहेत. मंदिराच्या उत्पन्नावर डल्ला मारण्याचा काँग्रेस सरकारचा डाव लक्षात घेऊन हिंदूंनी त्यास वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक !