प्रताप क्रीडा मंडळाचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्हाचे वाटप
अकलूज (जिल्हा सोलापूर), १० ऑगस्ट (वार्ता.) – वर्ष १९७६ मध्ये ‘प्रताप व्हॉलीबॉल संघा’ची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेणार्या ३६ संस्थापक सदस्यांचा येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने सन्मान केला. या मंडळाचे आज विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे या ३६ संस्थापक सदस्यांची आणि त्यांच्या कार्याची ओळख पुढील पिढीला व्हावी, यासाठी १० ऑगस्ट या दिवशी शंकरनगर येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रताप क्रीडा मंडळाचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु (श्री.) नंदकुमार जाधव यांच्यासह ३६ मान्यवरांचा सन्मान केला. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी प्रताप क्रीडा मंडळाची स्थापना ते आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा सांगितला.
सहकार महर्षि शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष १९७८ मध्ये विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर प्रताप व्हॉलीबॉल संघाचे रूपांतर प्रताप क्रीडा मंडळामध्ये झाले. या ३६ मान्यवरांच्या सहकार्यामुळे अकलूज सारख्या ग्रामीण भागात राष्ट्रीय सामने, बाल क्रीडा स्पर्धा, कब्बड्डी, खो-खो आणि कुस्ती यांच्या स्पर्धा यशस्वीरित्या राबवण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप ‘सारे जहां से अच्छा…’ या गीताने करण्यात आला.
क्षणचित्र
या सोहळ्याच्या वेळी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी सद्गुरु (श्री.) नंदकुमार जाधव यांना गीत गाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार सद्गुरु (श्री.) नंदकुमार जाधव यांनी ‘हम कैसे भुलायेंगे….’ हे गीत सादर केले.