कलेसाठी कला हवी !

केक म्हणजे सर्वांचाच आवडता खाद्यपदार्थ ! विविध रंग आणि आकार यांमध्ये सिद्ध केलेला केक लोकप्रिय असतो. सध्या या केकला विविध प्रकारांमध्ये सिद्ध करून कलाकृतीतील वेगळेपण दाखवण्याचा अत्याधुनिक प्रयत्न केला जात आहे. केक आकर्षक दिसण्यासाठी काही वेळा पृथ्वी, बाहुली, गळ्यातील सोनसाखळी इत्यादी विविध प्रकारच्या संकल्पना त्यात वापरलेल्या असतात. हे केक नंतर सुरीने कापण्यात येतात. अशा कलाकृतींवर सुरी फिरवणे कितपत योग्य ? ज्या पृथ्वीचे सर्वांनी रक्षण करायचे असते, तिच्या केकवरील कलाकृतीवर सुरी फिरवण्यातून तिचा एकप्रकारे अवमानच केला जात नाही का ? मनोरंजन आणि मौजमजा या नावाखाली तसेच झटपट प्रसिद्धी अन् पैसा या मोहापोटी कलेला कोणतेही वळण दिले जाते.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

केकच्या कलाकृतींनी आता हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या सीमाच पार केल्या आहेत. मंगळसूत्र, बांगड्या, पाटल्या, कुंकू हे सर्व साहित्य वर ठेवल्याचे दाखवून त्या खाली हुबेहुब पैठणी साकारणारे केक पेठेत आले आहेत. सामाजिक संकेतस्थळांवर अशा छायाचित्रांना अनेक ‘लाईक्स’ मिळतात. ‘या केकवर सुरी फिरवावी आणि पैठणी साडी असलेला केक खावा’, ही कल्पनाही करवत नाही. पैठणी म्हणजे स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय ! या पैठणीला प्रत्येक स्त्री पुष्कळ जपत असते. तिला कापण्याचा विचारही स्त्रियांच्या मनाला शिवणार नाही. असे असतांना पैठणीवर सुरी फिरवणे, हे कुठल्यातरी संस्कृतीत बसते का ? त्या पैठणीच्या केकवर सौभाग्याचे लेणे असलेल्या मंगळसूत्राचीही कलाकृती असते. मंगळसूत्रावर सुरी फिरवणे म्हणजे एकप्रकारे पापच पदरात पाडून घेतल्यासारखे आहे. बांगड्या, पाटल्या, सोनसाखळी, कानातले अशी हिंदु संस्कृतीची प्रतीके केकवर सिद्ध करणे आणि कापण्याच्या अन् खाण्याच्या माध्यमातून त्यांचा अवमान करणेच होय. आज अलंकार आणि साडी यांना केकवर आणणारे उद्या देवतांच्या प्रतिकृतीही केकवर सिद्ध करतील. ही वेळ ओढावू नये, यासाठी प्रत्येक हिंदूने वेळीच सतर्क होऊन या विरोधात आवाज उठवायला हवा. अशा केकवर सर्वांनी बहिष्कार घातल्यासच समाजापर्यंत योग्य दिशा जाऊन विकृतपणाला आळा बसेल ! असे केक सिद्ध करण्यासाठी मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक ठरतील असे कृत्रिम रंग वापरण्यात येतात. या सर्व सूत्रांचा विचार केल्यास कलेतील कलात्मकता टिकून राहील, हेच खरे !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.