तळोजा येथील ‘परमशांतीधाम’ या वृद्धाश्रमाची जागा कह्यात घेण्यासाठी सिडकोकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मेट्रोच्या स्थानकासाठी ही जागा संपादित करण्यात येणार आहे. ‘मेट्रोचे स्थानक अन्यत्र उभारावे आणि वृद्धांची सेवा अखंडपणे चालू रहावी’, असे वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज (जुना आखाडा) यांनी व्यक्त केले आहे. सरकारी स्तरावर त्यांचे त्यासाठी प्रयत्नही चालू आहेत.
समाजात वृद्धाश्रमांची आवश्यकता निर्माण होण्यास समाजाचे नैतिक अधःपतन कारणीभूत आहे. पैसा आणि भौतिक सुविधा यांवर केंद्रित करणार्या शिक्षणपद्धतीमुळे समाजाची वृत्ती स्वार्थांधतेकडे झुकली आहे. त्यामुळे मुलांना आई-वडिलांना सांभाळणे जड वाटू लागले आहे. बर्याचदा मुलांनी दायित्व झिडकारल्यामुळेच वृद्धांची फरफट होते. अशा वृद्धांना वृद्धाश्रमांविना कुणाचा आधार रहात नाही. ‘परमशांतीधाम’ या वृद्धाश्रमात वृद्धांची विनामूल्य सेवा केली जाते. अशा सेवाकार्यात बाधा यायला नको, याचे दायित्व सिडकोने घेणे अपेक्षित होते. ५१ वृद्धांना सांभाळायचे दायित्व घेणारे वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांना या वयात वृद्धाश्रम अबाधित ठेवण्यासाठी धडपड करावी लागणे, हे सरकारसाठी चिंताजनक आहे.
वृद्ध नागरिक हे समाजाचा एक घटक आहेत. त्यामुळे त्यांचे दायित्व ओघाने सरकारकडेच येते. त्यांचे आश्रयस्थान जर कुणी कह्यात घेऊ पहात असेल, तर त्यांना न्याय देणे, हे सरकारचे कर्तव्यच आहे. आधीच येथील वृद्ध नागरिकांच्या मनावर मुलांनी नाकारल्याच्या अथवा अन्य वैयक्तिक समस्यांच्या डागण्या आहेत. अशात त्यांच्या वाटेला आलेले समाधान अबाधित ठेवले जायला हवे. एरव्ही जंगले तोडू नयेत, यासाठी पर्यावरणप्रेमी विकासकामांना विरोध करतात. वनसंपदा सुरक्षित ठेवावी, हे योग्यच आहे; मात्र जेव्हा वृद्धाश्रमांवर जागा सोडण्याची वेळ येते, त्या वेळी वृद्धांसाठी कुणाच्या मनात कणव का निर्माण होत नाही ? समाज याविषयी काहीच कृती का करत नाही ? याचा नागरिकांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. युवा पिढी देशाच्या प्रगतीचा कळस असेल, तर ज्येष्ठ नागरिक त्याचा पाया आहेत. त्यामुळे त्यांची उपेक्षा थांबायला हवी !
– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, देवद, पनवेल.