हुडकेश्वर पोलीस ठाण्याला नागरिकांचा घेराव !
महेश राऊत यांना अमानुषपणे मारहाण करणार्या उत्तरदायी पोलिसांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाका !
नागपूर – येथे रहाणारे महेश राऊत (वय ३५ वर्षे) या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ‘२ ऑगस्ट या दिवशी महेश यांनी शेजारी भांडण असल्याच्या कारणावरून १०० क्रमांकावर दूरभाष करण्याच्या कारणावरून पोलिसांनी त्यांना विनाकारण मारहाण केली आहे’, असा आरोप महेश यांचे नातेवाईक आणि नागरिक यांनी केला आहे. (काही दिवसांपूर्वी अपंग मनोज ठक्कर यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांना शहरात आता अशी दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे असे पोलीस जनतेचे रक्षणकर्ते आहेत, असे म्हणता येईल का ? पोलिसांच्या अशा वर्तणुकीमुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास न्यून होत आहे. – संपादक)
१. महेश यांच्या घराच्या शेजारी दोघांमध्ये भांडण चालू होते. याविषयी त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर दूरभाष करून सूचना दिली होती. त्यानंतर महेश स्वतःचा भ्रमणभाष भारित करण्यासाठी लावून ते भांडण चालू असलेल्या ठिकाणी गेले होते.
२. प्रवीण आलम आणि किशोर शिराळे हे पोलिसांचे २ ‘बिट मार्शल’ घटनास्थळी येत होते; मात्र त्यांना घर शोधण्यात अडचणी येत होत्या. त्यांनी महेश यांना वारंवार दूरभाष केले; मात्र महेश बाहेर असल्याने त्यांनी भ्रमणभाष उचलला नाही.
३. ‘बिट मार्शल’ घटनास्थळी पोचेपर्यंत वाद मिटला होता. त्यानंतर प्रवीण आलम आणि किशोर शिराळे यांनी महेश यांच्याकडे दूरभाष करण्याच्या संदर्भात विचारणा केली; मात्र महेश यांनी दिलेल्या उत्तरावर ते असमाधानी झाले. त्यामुळे संतापलेल्या त्या दोघांनी लोकांसमोरच महेश यांना पुष्कळ मारहाण केली. त्यानंतर ‘पोलिसांच्या मारहाणीत आत्मसन्मान दुखावला गेला असल्यामुळे मी आत्महत्या करत आहे’, अशी चिठ्ठी लिहून महेश यांनी आत्महत्या केली.
४. ‘महेश राऊत यांनी भांडण चालू असल्याने त्यातून अप्रिय घटना घडू नये, या उद्देशाने जागरूक नागरिक असल्याचे कर्तव्य पूर्ण केले होते; मात्र पोलिसांनी त्यांना विनाकारण मारहाण केल्याने त्यांचा आत्मसन्मान दुखावला गेला. त्यामुळेच त्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले’, असा आरोप करत नागरिकांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्याला घेराव घालत रोष व्यक्त केला.
५. संतप्त नागरिकांची संख्या लक्षात घेऊन पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधिकार्यांनी ‘या प्रकरणाची चौकशी करून कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन दिले. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.