ढगफुटी (क्लाऊड बस्टी)!

काही वर्षांपूर्वी केवळ हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये होणारी ढगफुटी (क्लाऊड बस्टी) आता देशात अनेक ठिकाणी होत आहे. महाराष्ट्र आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातही ढगफुटीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. वर्ष २०१९ मध्ये पुण्यात ढगफुटी होऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. यंदाही २२ जुलै २०२१ या दिवशी जवळपास १३ ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. ग्रामीण भागात रडारयंत्रणा नसल्याने या पावसाचे मोजमाप करणे शक्य झाले नाही. यात ताम्हिणी घाटात ४८६ मिमी पाऊस झाला. चिपळूण येथे ४००, तर महाबळेश्वरमध्ये ४८० मिमी पाऊस झाला. राज्यात मुंबई आणि पुणे वगळता इतरत्र रडारची संख्या अल्प आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे मोजमाप घेता आले नाही. कोल्हापूर जिल्ह्यात ढगफुटी होऊन अतीवृष्टी झालेला पाऊस इतका होता की, दोनच दिवसांच्या पावसाने कोल्हापूरचा अन्य गावांशी वा जिल्ह्यांशी संपर्क तुटला. इतकी बिकट स्थिती झाली होती.

बेसुमार वृक्षतोड करून इमारतींचे जंगल उभे करणे, अनियंत्रित संख्येने वाहनांची निर्मिती, इमारतींच्या झगमगाटांसाठी काचेचा आणि दिव्यांचा अतीवापर, शीतपेयांसाठी भूमीतून अमर्याद पाण्याचा उपसा, टिकाऊ म्हणून प्लास्टिकचा अमर्याद वापर, रासायनिक खतांचा अमर्याद वापर यांसह अनेक गोष्टींद्वारे निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टींमुळे आपण स्थुलातील प्रगती केली; मात्र ही प्रगती मानवाचे आरोग्य आणि पर्यावरण यांच्या मुळावर उठली आहे. अनिर्बंध वृक्षतोड, त्यामुळे होणारी जमिनीची धूप, नदीच्या प्रवाहात अवैधरित्या बांधकाम करून प्रवाहात अडसर आणणे या सर्व गोष्टीही ढगफुटीस कारणीभूत असल्याचे पर्यावरणतज्ञ सांगतात.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या म्हणण्यानुसार ‘सहस्रो वर्षे प्रदूषणमुक्त असलेली पृथ्वी विज्ञानाने केवळ १०० वर्षांत प्रदूषणग्रस्त करून प्राणीमात्रांचा विनाश जवळ आणला आहे.’ याचाच अर्थ हिंदु धर्मातील बहुतांश कृती या निसर्ग अनुकूल आहेत, म्हणजेच मानव आणि निसर्ग हातात हात घालून जातील, अशाच आहेत. त्यामुळे ढगफुटी आणि तापमानवाढ असलेल्या अन्य समस्यांच्या निराकरणासाठी हिंदु संस्कृती अन् अध्यात्म याचाच अंगीकार करावा लागेल !

–  श्री. अजय केळकर, सांगली.