जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी ४ गोळ्या झाडण्यात आल्या. कुलभूषण पाटील हे क्रिकेट खेळण्यावरून दोन गटांत झालेला वाद मिटवण्यासाठी गेले होते. यातील एका गटाच्या सदस्यांनी त्यांना शिवीगाळ केली होती. काही वेळाने एका वाहनातून ४-५ जणांनी त्यांच्या घरी येऊन गोळ्या झाडल्या. ही घटना ताजी असतांनाच जिल्ह्यातील पळासखेडे येथेही गोळीबाराची घटना घडली. या घटनेमध्ये दोन शेतकर्यांमध्ये शेतातील रस्त्यावरून वाद होता. एकाने दुसर्याची बैलगाडी अडवल्याने वाद झाला आणि एकाने दुसर्यावर ३ गोळ्या झाडल्या.
उपरोक्त दोन्ही घटनांमागील कारण अतिशय क्षुल्लक आहे. खरेतर विचारांचा प्रतिवाद विचारांनी व्हायला हवा आणि तंटा सामंजस्याने सोडवायला हवा. त्यासाठी असे दहशत निर्माण करणारे कृत्य करणे कितपत योग्य आहे ? दिवाळीला फटाके फोडावेत, त्याप्रमाणे लोक बिनधास्तपणे गोळ्या झाडत आहेत. यावरून कायद्याचे भयच राहिले नसल्याचे लक्षात येते. लोकप्रतिनिधी असूनही जीवन असुरक्षित असेल, तर सर्वसामान्य जनतेचे काय होणार ? पिस्तूल हे संरक्षणासाठी आहे कि आक्रमणासाठी ? असे प्रश्न अशा घटनांमुळे निर्माण होतात.
वरील प्रकारची गुन्हेगारी कृत्ये अशीच चालू राहिली, तर नागरिकांना जीव मुठीत धरून रहावे लागेल. हे रोखण्यासाठी गुन्हेगारांना ‘पोलिसी खाक्या’ दाखवून त्यांच्यावर धाक निर्माण करणे आवश्यक आहे. याचसमवेत शेतातील रस्त्यांसारखे वाद त्वरित मिटवण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना काढायला हवी. ‘प्रशासन समस्या सोडवू शकते’ आणि ‘गुन्हा केल्यास पोलीस कठोर कारवाई करू शकतात’, हा समजच समाजातून हळूहळू लोप पावत चालला आहे. त्यामुळे लोक कायदा हातात घेतात. मनात राग धुमसत राहून वैमनस्य निर्माण होते आणि विवेक दूर राहून गुन्हे केले जातात. हे थांबवण्यासाठी पोलीस अन् प्रशासन यांनी प्रयत्न करणे तर अपेक्षित आहेच, तसेच गुन्हेगारामध्ये अंतःपरिवर्तनही व्हायला हवे. यासाठी समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे. शासन, प्रशासन आणि धर्मशिक्षण देणे या तीनही स्तरांवर प्रयत्न झाल्यास गुन्हेगारी नष्ट होऊ शकते !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव