पुणे येथे उद्घाटन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर उलटी काळी बाहुली लटकवली आणि बिब्बा लावला !

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप !

विदेशातील लोक वाईट शक्तींचे अस्तित्व मान्य करून त्याविषयी संशोधन करत आहेत, तर अंनिस याला थेट अंधश्रद्धा म्हणून लोकांमध्येच अंधश्रद्धा पसरवत आहे. अशा अंनिसवर बंदी घालावी, असे सश्रद्ध हिंदूंना वाटते.

 

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – येथील नव्याने उद्घाटन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर उलटी काळी बाहुली आणि बिब्बा अडकवण्यात आला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, ‘‘२१ व्या शतकात आधुनिक माणूस सक्षम होण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सत्तेतील लोक यांनी सजग होणे आवश्यक आहे. पक्ष कार्यालयाबाहेर काळी बाहुली आणि बिब्बा लावणे ही अंधश्रद्धेला चालना देणारी कृती आहे. अंधश्रद्धा दैनंदिन आयुष्यातील व्यवहारातून घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. लोकप्रतिनिधींनी याविषयी काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे झालेली चूक लवकर सुधारून अशा प्रकारांना फाटा देत कालसुसंगत वर्तन करावे.’’ ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा या कृतीवर गप्पा पुरोगामीपणाच्या आणि काम अंधश्रद्धा वाढवण्याचे’, असे सांगत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली.

याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नसून या कार्यालयात २२ कार्यालये आहेत. जागामालकांनी ही काळी बाहुली आणि कोहळा लावला असेल. आम्हीही याविषयी अनभिज्ञ होतो. आम्ही जागामालकाला याविषयी सांगू.’’

नियमांचे उल्लंघन करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यकर्त्यांनी पुष्कळ गर्दी केली होती. त्यामुळे त्यात कोरोनाविषयीच्या नियमांचे उल्लंघन झाले. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करायला पोलिसांना सांगणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, माजी नगरसेवक, सरचिटणीस यांच्यासह १५० महिला आणि पुरुष पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता.