गाळेल येथे खचलेल्या डोंगराखाली गाडला गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

डोंगर खचून त्याखाली गीतेश गावडे गाडला गेला होता.

सावंतवाडी – जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीत तालुक्यातील गाळेल येथे डोंगर खचून त्याखाली वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील युवक गीतेश गावडे गाडला गेला होता. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि स्थानिक प्रशासन गेले ७ दिवस गीतेशचा शोध घेत होते. अखेर घटनेच्या ८ व्या दिवशी म्हणजे ३० जुलैला प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आले आणि गीतेशचा मृतदेह सापडला.

गीतेश गावडे

गीतेश हा गोवा राज्यात दुचाकीने कामाला जात असे. २३ जुलैला झालेल्या अतीवृष्टीच्या वेळी तो गाळेल-डिंगणेमार्गे गोव्यात जात असतांना अचानक गाळेल येथे डोंगर खचून संपूर्ण रस्त्यावर आला. त्या वेळी गीतेश, तसेच त्याच्या मागून एका चारचाकीतून काही जण जात होते. डोंगर कोसळत असल्याचे लक्षात आल्याने चारचाकीतील व्यक्तींनी गाडीच्या बाहेर येऊन पळ काढला; मात्र त्यांची गाडी आणि गीतेश मात्र डोंगराखाली सापडले. गीतेश डोंगराखाली असल्याचे त्या चारचाकीतील व्यक्तींमुळे समजले होते. त्यानंतर प्रशासनाने गीतेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दोन दिवस सर्व यंत्रणा राबवूनही त्याचा मृतदेह न सापडल्याने प्रशासनाने शोध मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला होता; मात्र शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी शोध मोहीम चालू ठेवण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने शोध मोहीम चालू ठेवल्याने ३० जुलैला गीतेशचा मृतदेह सापडला.