इंग्रजी भाषेच्या शिक्षणामुळे होणारी हानी कळलेले द्रष्टे लोकमान्य टिळक !

१ ऑगस्ट २०२१ या दिवशी लोकमान्य टिळक यांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने…

‘२७ फेब्रुवारी १९०८ या दिवशी सोलापूर येथील व्याख्यानात लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांनी केलेल्या मराठी भाषेच्या गळचेपीचे दुष्परिणाम सांगितले. ते म्हणाले, ‘‘इंग्रजी भाषा फार द्वाड आहे. ती लवकर येत नाही. ती सोपी नाही. केवळ ‘शासनकर्त्यांची’ म्हणून आम्हास ती शिकावी लागते. आमच्यावर ते निवळ ओझे आहे. आमचे शिक्षण मराठीत मिळत नसल्यामुळे पुष्कळ हानी होत आहे. आपणास इंग्रजीत दोन-दोन घंटे बोलण्याची काय म्हणून आवश्यकता वाटावी ? मराठी बोलणारा साहेब एक तरी निघाला आहे काय ? पण आमच्यापैकी शेकडो लोक इंग्रजी बोलतात. आम्ही इंग्रजी भाषेचे ज्ञान शिकण्यात अनेक वर्षे फुकट घालवली. मला मिळालेले ज्ञान मराठी भाषेत मिळाले असते, तर हे सर्व ५२ वर्षांचे ज्ञान २५ व्या किंवा ३० व्या वर्षीच मला मिळाले असते. या इंग्रजी भाषेमुळे वर्षे फुकट जातात. राष्ट्रास परक्या भाषेत शिक्षण देणे, म्हणजे त्याला नपुंसक (खच्ची) करण्यासारखे आहे. याचकरता देशी भाषेत ज्ञान दिले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य वाचणार आहे. धर्माचे शिक्षण मिळणार आहे. आम्ही बॅरिस्टर झालो, तरी धर्मासंबंधी भोपळ्याएवढे पूज्यच आहोत !’’ इंग्रजी भाषा शिकण्यापायी वर्षेच्या वर्षे फुकट जातात आणि धर्मासंबंधीचे ज्ञान ‘शून्य’ मिळते, हे लोकमान्यांचे दोन्ही विचार कुणाही राष्ट्रवाद्याला अंतर्मुख करतील !’

– श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी.