प्रत्येक सेवा कौशल्याने करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मीनाक्षी धुमाळ यांची सहसाधिकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये !

गुरुसेवेची तीव्र तळमळ असलेल्या आणि प्रत्येक सेवा कौशल्याने करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मीनाक्षी धुमाळ यांची सहसाधिकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये !

सौ. मीनाक्षी धुमाळ

१. शिकण्याची वृत्ती असल्याने सेवा आत्मसात करून त्यात सुसूत्रता आणणे

‘आरंभी सौ. मीनाक्षी धुमाळ गोव्यातील प्रसाराशी संबंधित सेवा पहात होत्या. नंतर त्यांनी ती सेवा आत्मसात करून त्यात आवश्यक असणार्‍या सुधारणा केल्या. पुढे त्यांच्या सेवेत वाढ झाली. त्या वेळी स्वतःसोबत अन्य साधकांना सेवेतील बारकावे शिकवणे, त्यांच्या अडचणी सोडवणे आणि सेवेत सुसूत्रता आणणे, असे प्रयत्न त्यांनी केले. सहसाधकांमध्ये चांगले गुण आढळल्यास त्या ते शिकण्याचा प्रयत्न करतात.’ – सौ. प्रेरणा हजारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. वक्तशीरपणा

‘पूर्वी मीनाक्षीताई पणजीला रहायच्या. आता त्या म्हापसा येथे रहातात आणि प्रतिदिन घरातून रामनाथी आश्रमात सेवेसाठी येतात. त्यांना सेवेच्या ठिकाणी पोचण्यासाठी दोन बस बदलाव्या लागतात, तरी सकाळी १०.३० ते १०.४५ पर्यंत त्या सेवेसाठी आलेल्या असतात.’ – सौ. छाया करंदीकर, फोंडा, गोवा.

३. उत्साही

‘आश्रमातून घरी पोचायला त्यांना रात्रीचे १० वाजून जातात; पण त्या नेहमी उत्साही असतात. सेवेसाठी कुणी त्यांना संपर्क केला, तर त्या भ्रमणभाषवरून आवश्यक ते साहाय्य करतात.’ – सौ. स्नेहा नाडकर्णी, फोंडा, गोवा.

४. सेवेतील गुणवैशिष्ट्ये

४ अ. उत्तम स्मरणशक्ती : ‘त्या गोवा आणि सिंधुदुर्ग अशा दोन ठिकाणी सेवा करतात. त्या अंतर्गत बर्‍याच सेवा असतात, तरीही सर्वच सेवांचे बारकावे त्यांच्या चांगले लक्षात रहातात आणि त्याप्रमाणे त्या संबंधित साधकांचा पाठपुरावाही घेतात.’ – सौ. छाया करंदीकर

४ आ. नियोजनकौशल्य : ‘दोन ठिकाणी सेवा, तसेच अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन सेवा अशा अनेक सेवा त्या करतात; पण त्या सर्व सेवांचे नियोजन उत्तम प्रकारे करून सेवा वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये काही अडचणी आल्यास लगेचच उत्तरदायी साधकांना विचारून त्यावर उपाययोजना काढतात.’ – सौ. छाया करंदीकर आणि सौ. स्नेहा नाडकर्णी

४ इ. उत्तम निरीक्षणक्षमता आणि चौफेर लक्ष असणे : ‘सेवेच्या ठिकाणी बर्‍याच प्रकारचे साहित्य असते, उदा. खोके, पंचांग, भित्तीपत्रके (पोस्टर्स), वह्या इत्यादी. एखादे नवीन ‘पार्सल’ आले किंवा असलेल्या साठ्यातील एखादे साहित्य न्यून झाले किंवा वस्तूंची नेहमीची जागा पालटली, तरी आल्याक्षणी त्यांच्या ते लगेच लक्षात येते. आश्रमातील एका कक्षात विक्रीचे साहित्य ठेवलेले आहे. तेथील मांडणीत काही पालट झाला, तरी त्यांच्या लक्षात येते आणि लगेचच त्या संबंधित साधकाला विचारतात.’ – सौ. छाया करंदीकर

४ ई. व्यवस्थितपणा : ‘काही वेळा पंचांगांचे, तसेच वह्यांचे खोके किंवा इतर साहित्य योग्य पद्धतीने ठेवलेले नसते. त्या वेळी त्या स्वतः ते व्यवस्थित ठेवतात आणि आम्हाला त्याची जाणीव करून देतात.

४ उ. सेवा अधिकाधिक होण्यासाठी प्रयत्न करणे : त्यांना कधी पुण्याला भावाच्या घरी जायचे असल्यास त्या आश्रमात येऊन सेवा पूर्ण करतात आणि रात्री पुण्याला जाण्यास निघतात. ‘बस रात्री ९ वाजता आहे, तर आपण ५ – ६ घंटे सेवा करू शकतो. वेळ कशाला वाया घालवायचा ?’, अशी त्यांची विचारप्रक्रिया असते. पुण्यावरून परत येतांना त्या सकाळी ६ वाजता घरी पोचतात आणि त्याच दिवशी आश्रमात ११ वाजेपर्यंत सेवेला येतात. यातून त्यांची गुरुसेवेची तळमळ लक्षात येते.’ – सौ. स्नेहा नाडकर्णी

४ ऊ. गुरुसेवेची तीव्र तळमळ : ‘गुरुसेवेची तीव्र तळमळ असल्याने ‘आपल्यामुळे सेवा थांबून गुरुकार्य थांबायला नको’, या विचाराने रुग्णाईत असतांनाही मीनाक्षीताई प्रतिदिन रामनाथी आश्रमात येतात आणि सेवा नियोजित वेळेत पूर्ण करतात.

४ ऊ १. पायाला झालेले कुरुप काढल्यावर लंगडत चालावे लागत असूनही सेवेत सवलत न घेणे : मीनाक्षीताई घरी असतांना किंवा अन्य कामानिमित्त त्यांना घरी थांबावे लागले, तर ‘त्या वेळी कोणती सेवा करता येईल ?’, याचे चिंतन करून सेवा करतात. एकदा त्यांच्या तळपायाला कुरुप झाल्याने शस्त्रक्रिया करून ते काढावे लागले आणि पायाला टाकेही पडले. त्यामुळे पाय टेकवता येत नसल्याने दुसर्‍या पायावर भार देऊन त्यांना लंगडत चालावे लागत होते. अशा स्थितीतही एक मासापेक्षा अधिक काळ त्या घरातून (म्हापसा येथून) आश्रमापर्यंत यायच्या. या कालावधीत त्यांनी अन्य एका जिल्ह्यातील त्यांची सेवाही पूर्ण केली.

४ ऊ २. थकव्यामुळे अंग थरथरत असतांनाही पूर्ण दिवस सेवा करणे : एकदा त्यांना जुलाब झाल्यामुळे पुष्कळ थकवा आला होता. थकव्यामुळे अंग थरथरत होते, अशाही स्थितीत त्या सेवेला आल्या. त्यानंतर पूर्ण दिवस सेवा करून रात्री घरी गेल्या.’ – सौ. छाया करंदीकर आणि सौ. प्रेरणा हजारे

४ ए. मुलाच्या लग्नात व्यस्त असतांनाही गुरुसेवेला प्राधान्य देऊन साधिकेला साहाय्य करणे : ‘सध्या मला शारीरिक अडचणींमुळे सेवेला वेळ देता येत नाही. तेव्हा मीनाक्षीताई मला सेवेत साहाय्य करतात. त्या नेहमी गुरुसेवेलाच प्राधान्य देतात. त्यांच्या मुलाचे पुण्याला लग्न होते. त्याच वेळी मला एका सेवेविषयी अडचणी येत होत्या. मी त्यांना संपर्क केल्यावर व्यस्त असूनही त्यांनी मला ‘सेवा कशी करू शकते ?’, हे सांगितले. त्यामुळे माझा ताण काही प्रमाणात न्यून झाला.

४ ऐ. ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने सेवा करणे

१. मीनाक्षीताई ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने सेवा करतात. सेवा करतांना साधकांना अडचण आली, तर त्या स्वतः साहाय्य करतात किंवा इतर साधकांचे साहाय्य देऊन सेवा पूर्ण करून घेतात.’ – सौ. स्नेहा नाडकर्णी

२. ‘एकदा सद्गुरु सत्यवान कदम गोवा राज्यात आले असता त्यांचे साधकांना साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन होते. आम्ही त्या ठिकाणी वेळेत पोचलो. तेथे साधकांनी चपला अव्यवस्थितपणे काढल्या होत्या. ते पाहून प्रथम मीनाक्षीताईंनी सर्व चपला व्यवस्थित ठेवल्या आणि नंतरच त्या आत गेल्या.’ – सौ. प्रेरणा हजारे

५. सध्या जाणवलेले पालट – अपेक्षांचे प्रमाण उणावणे

‘पूर्वी मीनाक्षीताईंना इतरांकडून पुष्कळ अपेक्षा असायच्या आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर त्यांची चिडचिड व्हायची. आता त्यांचे अपेक्षांचे प्रमाण उणावले असून त्या निरपेक्षपणे सेवा करण्याचा प्रयत्न करतात.

‘परात्पर गुरु डॉक्टरांनीच हे लिखाण आमच्याकडून करवून घेतले, याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता आणि सौ. मीनाताईंसारखे गुण आमच्यातही येऊ देत’, अशी प्रार्थना !’

– सौ. छाया करंदीकर आणि सौ. प्रेरणा हजारे (२१.११.२०१९)

सौ. मीनाक्षी धुमाळ यांना आलेली अनुभूती

बसमध्ये दारू प्यायलेली व्यक्ती अंगावर येत असतांना तिला मोठ्याने नीट उभे रहाण्यास बजावून ‘कंडक्टर’ला क्षात्रवृत्तीने त्या व्यक्तीला खाली उतरवायला सांगणे, त्या वेळी बसमधील एका प्रवाशाने माझ्या बोलण्यासा दुजोरा दिल्याचे पाहून देवानेच माझ्यात क्षात्रवृत्ती निर्माण करणे

‘एकदा मी रात्री ८.४० च्या बसने घरी जात होते. मी ज्या आसंदीवर बसले होते, तेथे एक माणूस सारखा माझ्या अंगावर येत होता. मी स्वभावाने भित्री होते. मी त्याला नीट उभे रहाण्यास सांगितले; परंतु तो दारू प्यायलेला असल्यामुळे ऐकत नव्हता. नंतर मी त्याला मोठ्याने नीट उभे रहाण्यास सांगितले. तेव्हा तो आणि त्याच्यासमवेत असलेला दुसरा माणूस बडबड करू लागले. तेव्हा मी क्षात्रवृत्तीने बसच्या ‘कंडक्टर’ला सांगितले, ‘‘बस पोलीस ठाण्यात ने, नाहीतर यांना खाली उतरव.’’ मागील आसंदीवरील व्यक्तीनेही माझ्या बोलण्याला दुजोरा दिला. मद्य प्यायलेला माणूस ‘कंडक्टर’ला काही बोलला नाही. पुढच्या स्थानकावर ते दोघेही उतरले. तेव्हा ‘मी एवढ्या लोकांमध्ये क्षात्रवृत्तीने कशी बोलले ?’, हे मला कळले नाही. नंतर कंडक्टर म्हणाला, ‘‘मी ‘केबिन’मध्ये बसलेल्या साहेबांना (पोलिसांना) सांगणारच होतो. आम्ही काही बोलू शकत नाही. उद्या आमची बस अडवली, तर अडचण येईल.’’

या प्रसंगातून देवाने मला शिकवले, ‘अडचणीच्या वेळी कुणीही आपले साहाय्य करणार नाही. केवळ देवच रक्षण करू शकतो. समाज स्वतःचा विचार करून बघ्याची भूमिका घेतो.’ अशा प्रसंगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच माझे रक्षण केले.’

– सौ. मीनाक्षी धुमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१२.२०१८)

सौ. मीनाक्षी धुमाळ यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्याच्या वेळी सहसाधकांनी त्यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

१. कु. अनुराधा जाधव

सौ. मीनाक्षीताई प्रत्येक वयाच्या साधकांमध्ये मिसळतात. दळणवळण बंदी लागू झाल्यावर ‘घरी राहून सेवा करावी लागणार’, या विचाराने आरंभी त्यांचा थोडा संघर्ष झाला; परंतु लगेच त्यांनी ती परिस्थिती स्वीकारली. घरात राहून व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे नियोजन करून वेळेचा पुरेपूर उपयोग कसा करता येईल, हे त्यांनी पाहिले. त्यांच्यात पुष्कळ मोकळेपणा निर्माण झाला आहे.

२. आधुनिक वैद्य नरेंद्र दाते

सौ. मीनाक्षी धुमाळ व्यष्टी साधनेच्या आढाव्यात मनाची सर्व प्रक्रिया अत्यंत मोकळेपणाने सांगतात. त्या झोकून देऊन आणि परिपूर्ण सेवा करतात. त्यांचे सेवेच्या संदर्भातील आढावे वेळेत येतात. त्यांना काही अडचण असेल, तर त्या तसे कळवतात. त्यांच्यातील समन्वयकौशल्यही चांगले आहे.

३. आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे

कोणतीही सेवा दायित्व घेऊन करण्याची त्यांची सिद्धता असते. त्यांना आधी चुकांची भीती वाटायची; पण आता ती न्यून झाली असून त्यांच्यातील भावनाशीलताही उणावली आहे. गेल्या वर्षी त्यांना नातू झाला. त्याही काळात त्या सर्व सेवा वेळेत पूर्ण करायच्या. त्यांनी ‘अपेक्षा करणे’ आणि ‘पूर्वग्रह’ या स्वभावदोषांवर मात केली आहे.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक