|
दोडामार्ग – तालुक्यातील कळणे खाण प्रकल्पाचा मातीचा बांध फुटल्याने खनिजयुक्त मातीसह पाण्याचा मोठा प्रवाह वस्तीत घुसला. यामुळे घरांसह शेती आणि बागायती यांची मोठी हानी झाली. रस्त्यावर पूर्णपणे चिखल आल्यामुळे कळणे-तळकट मार्ग बंद करण्यात आला. ही दुर्घटना २९ जुलैला सकाळी ८ वाजता घडली; मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले. जनतेचा तीव्र विरोध डावलून चालू असलेल्या या प्रकल्पाचा हा दुष्परिणाम असून ग्रामस्थांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
कळणे येथे खाण प्रकल्प चालू करण्यास स्थनिकांचा मोठा विरोध झाला होता. खनिज उत्खननामुळे येथे मोठा खड्डा पडून खाणीत मोठा जलसाठा निर्माण झाला होता. हे पाणी डोंगराच्या खाली असलेल्या वस्तीत जाऊ नये; म्हणून मोठा बंधारा बांधण्यात आला होता. २९ जुलैला भूस्खलन होऊन तेथील डोंगराचा काही भाग खाणीत कोसळला. परिणामी खाणीतील खनिजयुक्त पाणी वेगाने बाहेर फेकले गेल्याने बंधारा फुटला आणि खनिजयुक्त पाणी येथील वसती आणि शेती-बागायती यांमध्ये घुसले. या वेळी ग्रामस्थांनी धोक्याच्या टप्प्यातील लोकांना सुरक्षित स्थळी हालवायला प्रारंभ केला. ३ घंट्यांहून अधिक वेळ पाण्याचा जोरदार प्रवाह वहात होता. यात उगाडे-कळणे रस्ता वाहून गेला.
घटनेची चौकशी करा ! – भाजपची मागणी
सावंतवाडी – कळणे खाण प्रकल्पात घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. चुकीच्या पद्धतीने केलेल्या उत्खननामुळे ही घटना घडली. अशा प्रकारे कुणी उत्खनन करत असतील, तर त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडू. या प्रकरणी संबंधितांची चौकशी झालीच पाहिजे. माती आणि चिखल गेल्यामुळे ज्या घरांची हानी झाली आहे, त्यांना तात्काळ हानीभरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
कळणे खाण आस्थापनावर गुन्हा नोंद करा ! – मनसेची मागणी
बांदा – कळणे येथे घडलेली दुर्घटना ही नैसर्गिक नसून मानवनिर्मिती आहे. या घटनेची चौकशी करून संबंधित आस्थापनावर गुन्हा नोंद करा. गेली १० वर्षे एकाच ठिकाणी सतत उत्खनन चालू असल्यामुळे हा प्रकार घडला, असा आरोप मनसेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे.
ग्रामस्थांमध्ये भीती
‘या खाण प्रकल्पाविषयी प्रशासनाला निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे आजची घटना घडली. आजची घटना ही भविष्यातील धोक्याची घंटा असून, याविषयी तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा भविष्यात या ठिकाणी मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीती येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.