देहली – गोव्याने तौक्ते चक्रीवादळातील आपद्ग्रस्तांना साहाय्य पुरवण्यासाठी केंद्र सरकारकडे आर्थिक साहाय्याची मागणी केलेली नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली. गोव्यासह इतर काही राज्ये यांना मे महिन्यात तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यामध्ये ३ जणांचे बळी गेले होते, २ सहस्र ४ घरांची हानी झाली होती, १६० गुरांचा मृत्यू झाला होता, २२७ हेक्टर क्षेत्रफळातील पिकांची नासाडी झाली होती. केरळ आणि झारखंड यांनीही आर्थिक साहाय्याची मागणी केलेली नाही. केंद्राकडे आर्थिक साहाय्याची मागणी केलेल्यांमध्ये महाराष्ट्र (९२ कोटी ३७ लाख रुपये), कर्नाटक (१० कोटी ८९ लाख रुपये), बंगाल (४ सहस्र ५२२ कोटी रुपये), गुजरात (९ सहस्र ८३६ कोटी रुपये) आणि दादरा नगरहवेली, दमण अन् दीव (५६ कोटी ५३ लाख रुपये) यांचा समावेश आहे, अशी माहिती श्री. राय यांनी लेखी उत्तरात दिली आहे.