सातारा, २९ जुलै (वार्ता.) – हिंदुजागृती आणि हिंदूसंघटन यांसाठी अहोरात्र झटणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सेवारत असणारे, समाजकार्यात अग्रेसर असणारे श्री. अविनाश दामले (सर) यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे गौरवोद्गार समाजसेविका वासंती लावंघरे यांनी काढले. २३ जुलै या दिवशी ‘सुखद व्यायाम वर्गा’च्या वतीने श्री. अविनाश दामले (सर) यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘स्नेहदीप सभागृहा’मध्ये हा ‘कृतज्ञता सोहळा’ पार पडला. या वेळी समाजसेविका श्रीमती वासंती लावंघरे यांच्या वतीने श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन दामलेसर यांचा सत्कार करण्यात आला. कोरोनाचे नियम पाळत २५ योगसाधकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
श्रीमती लावंघरे पुढे म्हणाल्या की, दामलेसर यांनी जीवनातील अनेक वर्षे संघाच्या कार्यासाठी दिली आहेत. समाजाच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे साहाय्य लाभले आहे. आताही योगाच्या माध्यमातून दामलेसर निरोगी, शांत, संयमी सशक्त नागरिक घडवत आहेत. योगानंतर थोडावेळ भारताची सद्यस्थिती, भारतापुढील आव्हाने, लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, प्रतिदिन हिंदु आणि हिंदु धर्म यांवर होणारे अत्याचार यांविषयी मार्गदर्शन करत असतात. वयोमानानुसार शारीरिक बंधने असूनही योगामध्ये सातत्य ठेवून समाजाला मार्गदर्शन करणार्या दामलेसर यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन उमाकांत पवार (सर) यांनी केले. या वेळी आसावरी आफळे यांनीही मनोगत व्यक्त केले.