अंबरनाथ येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून पुराच्या पाण्यात अडकलेल्या ७० प्राण्यांना जीवदान !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

ठाणे, २९ जुलै (वार्ता.) – बदलापूर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे येथील उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. पुराच्या पाण्याचा फटका ५ किलोमीटरवर असणार्‍या गणराज दादा जैन यांच्या अपंग प्राण्यांच्या पाणवठा या अनाथाश्रमालाही बसला. मध्यरात्री २.३० वाजता पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे प्राण्यांचे पिंजरे पाण्याखाली गेले होते; मात्र श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी प्राण्यांची सुटका केली.

अग्नीशमन दल आणि एन्डीआर्एफ् यांच्या तुकडीने आश्रमातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवले अन् अन्य ठिकाणी अडकलेल्या माणसांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यास या तुकड्या रवाना झाल्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अंबरनाथ तालुका विभागाचे धारकरी प्रसाद दळवी, अज्जु राठोड, तेजस भोईर, ऋषिकेश ठसाळ, विजय पाटील, ओमकार जगे, विनीत मोरे लगेचच घटनास्थळी गेले. शिवछत्रपतींचे नाव घेऊन मानवी साखळी करून हळूहळू आश्रमात जाण्यास प्रारंभ झाला. पाण्याची पातळी न्यून झाल्यामुळे पिंजर्‍यात अडकलेले कुत्रे, मांजरे, माकड, घोडा, बदक करकोचा, कोंबडा, गाढव अशा ७० प्राण्यांची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी सुटका केली. आश्रम आणि प्राण्यांचे पिंजरे यांची पुष्कळ हानी झाली आहे.