कर्मचार्यांमधील ही अनैतिकता प्रशासनाला लज्जास्पद !
पणजी, २९ जुलै (वार्ता.) – २५ जुलै या दिवशी बाणावली समुद्रकिनार्यावर २ अल्पवयीन मुलींवर पोलीस असल्याचा बहाणा करून बलात्कार करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी कह्यात घेतलेल्या संशयितांपैकी एक जण कृषी खात्यामध्ये वाहनचालक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २८ जुलैला विधासभेत दिली. संशयितांपैकी राजेश माने (वय ३३ वर्षे) हा झरीवाडा, दवर्ली येथील रहिवासी असून तो गोवा सरकारच्या कृषी खात्यामध्ये वाहनचालक आहे. २५ जुलैच्या रात्री मुले आणि मुली मिळून १० जणांचा गट बाणावली समुद्रकिनार्यावर गेला होता. त्यानंतर यातील २ मुली आणि ३ मुले रात्री उशिरापर्यंत समुद्रकिनार्यावर थांबली अन् उर्वरित ५ जण घरी परतले. त्यानंतर उत्तररात्री ३ वाजता पोलीस असल्याचा बहाणा करून संशयितांनी ३ मुलांना मारहाण करून दोन्ही मुलींना अन्यत्र नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. या घटनेचे चित्रीकरण करून ते सामाजिक माध्यमांत प्रसारित करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलींकडून भ्रमणभाषवर संदेश पाठवून ६५ सहस्र रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर पीडित मुलींनी याविषयी पोलिसांकडे तक्रार केल्यावर संशयितांना पोलिसांनी कह्यात घेतले होते.