ठाणे, २९ जुलै (वार्ता.) – मुंबई आणि ठाणे येथील माजी पोलीस आयुक्त तसेच गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांच्या निर्देशावरून ठाणे खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकार्यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची चेतावणी देऊन साडे तीन कोटी रुपये उकळले, असा गंभीर आरोप क्रिकेट बुकी सोनू जलान यांनी केला. त्यांचे मित्र केतन तन्ना यांच्याकडूनही १ कोटी २५ लाख रुपये वसुली केल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला. परमबीर सिंग आणि तत्कालीन खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी यांच्या विरोधात २९ जुलै या दिवशी जलान याने लेखी तक्रार ठाणेनगर पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात आतापर्यंत २ गुन्हे नोंदवण्यात आले असून ही तिसरी तक्रार करण्यात आली आहे.