पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने १ ऑगस्टला ‘लोकअदालत’चे आयोजन !

पुणे – येत्या १ ऑगस्ट या दिवशी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ‘लोकअदालत’ आयोजित केली आहे. यामध्ये दाखल आणि दाखलपूर्व (नोंद आणि नोंदपूर्व) असे जिल्ह्यातील ५६ सहस्र दावे ठेवले जाणार आहेत. यामध्ये तडजोडीस पात्र असलेले दावे निकाली निघण्यावर भर दिला जाणार आहे. दावे निकाली काढण्यासाठी प्रमुख न्यायाधीशपदी एस्.के. देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार ४५ ‘पॅनल्स’ सिद्ध केले आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयातील गर्दी टाळण्यासाठी प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने अदालतीचे कामकाज होणार आहे. भूसंपादन, धनादेश न वटणे, कौटुंबिक, मोटार अपघात यांच्याशी निगडित दावे, त्याचप्रमाणे दिवाणी आणि तडजोड योग्य फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. छोट्या प्रकरणांसाठी २९ ते ३१ जुलै या कालावधीत विशेष मोहीम राबवली जाणार आहे.