नागपूर येथे महापालिका प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकारी ऐकत नसल्याने नगरसेवक हतबल !

नगरसेवकांचे जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष !

समस्या सोडवून विकासकामे करण्यासाठी जनतेने निवडून दिलेले असतांनाही तिच्या समस्या न सोडवणारे कर्तव्यचुकार नगरसेवक ! प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असतांना पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि आयुक्त झोपले आहेत का ? ते अशांना बडतर्फ करून नवीन कर्मचार्‍यांची भरती का करत नाहीत ?

नागपूर – महापालिका निवडणुकीला ८ मासांचा कालावधी असून नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार शहरातील वस्त्यांमध्ये फिरत आहेत. नागरिकही त्यांना समस्या सांगत आहेत. तेव्हा ‘प्रशासनाकडून कामे होत नाहीत. अधिकारी आणि कर्मचारी आमचे ऐकत नसल्यामुळे आम्ही काय करू ?’ अशी हतबलता नगरसेवक दर्शवत आहेत. नगरसेवक जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील विविध भागांतील मूलभूत समस्यांविषयी नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. ऐन पावसाळ्यात शहरातील अनेक भागात कचर्‍याचे ढिग आणि अतिक्रमण यांची समस्या वाढली आहे.

प्रभागानिहाय नागरिकांच्या समस्या महापालिका ‘ॲप’वर किंवा नगरसेवकांना सांगितल्या जातात. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक प्रभागांत ठराविक स्वच्छता कर्मचारी काम करतांना दिसतात, तर काही कर्मचारी केवळ जमादारांना दिसणार नाही, अशा भागात जाऊन बसतात. अशा स्वच्छता कर्मचार्‍यांवर ‘झोन’मधील अधिकार्‍यांचे नियंत्रण नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. ‘गेल्या साडेचार वर्षांत शहरातील अनेक महिला नगरसेवक प्रभागांत फिरकल्याही नाहीत’, असे नागरिकांनी सांगितले. या कारणास्तव नागरिक अप्रसन्न आहेत.