१०० कोटी रुपये वसुलीचे प्रकरण
पुणे, २८ जुलै – १०० कोटी रुपये वसुली प्रकरणी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे साहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुण्यातील घरावर २७ जुलैच्या रात्री केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआय) धाड घातली आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयित असलेले सचिन वाझे अँटलिया स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणी सध्या अटकेत आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या संपर्कात हे दोघेही होते. परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुली प्रकरणात आरोप करतांना संजय पाटील यांच्यासोबत असलेले ‘व्हाट्सअॅप चॅटिंग’ पुरावे म्हणून जोडले होते आणि याच प्रकरणात ही कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.
संजय पाटील पोलीस निरीक्षक म्हणून पुण्यात कार्यरत होते. पुण्यातील येरवडा, गुन्हे शाखा याठिकाणी त्यांनी काम केले आहे. पोलीस निरीक्षक पदावरून बढती मिळाल्यानंतर ते साहाय्यक आयुक्त म्हणून पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात गेले होते. तेथून त्यांचे स्थानांतर मुंबई पोलीस दलात झाले होते.