पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना आता सरपटणारे प्राणी आणि रोगराई यांची भीती !

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २८ जुलै (वार्ता.) – पावसाचा जोर अल्प झाल्याने राज्यातील ग्रामीण भागात आलेला पूर ओसरला आहे; मात्र आता पूरग्रस्तांसमोर अन्य अनेक समस्या उभ्या आहेत. घरादारांतील चिखल काढत असतांना पूरग्रस्तांसमोर आता पुराच्या पाण्यासमवेत वाहून आलेल्या सापांचेही संकट निर्माण झाले आहे. घरोघरी साप आदी सरपटणारे प्राणी मिळत आहेत. चिखल आणि घाण यांमुळे रोगराई पसरण्याची भीतीही वाढली आहे. पूर ओसरला असला, तरी परिस्थिती पूर्वपदावर येण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्वातंत्र्यसेनानी दादा राणे यांच्या घराला तडे

पोर्तुगिजांच्या विरोधात बंड पुकारलेले अडवई येथील स्वातंत्र्यसेनानी दादा राणे यांच्या अडवई येथील वडिलोपार्जित घराला पुरामुळे तडे गेले आहेत. या घरात सध्या दोन कुटुंबे रहातात. घरातील सर्व किमती साहित्य पुरामुळे वाहून गेले आहे. घरात सुमारे २ मीटर उंचीपर्यंत पाणी साचल्याने घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे ऐतिहासिक, तसेच पुरातन वास्तूच्या संवर्धनाचा विषय ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या वास्तूचे संवर्धन करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी दादा राणे यांचे वंशज उदयसिंह राणे यांनी केली आहे.

 तिलारीचे पाणी अचानक सोडल्याने बार्देश तालुक्यातील ४ गावांमध्ये पूर

तिलारीचे पाणी अचानक सोडल्याने शापोरा नदीचे पाणी वाढून बार्देश तालुक्यातील कार्मुली, नानोडा, रिवारो आणि कोलवाळ या गावांना पुराचा तडाखा बसला. यासाठी संबंधितांना दोषी धरले पाहिजे. प्रतिवर्ष जुलै किंवा ऑगस्ट या मासांमध्ये या ४ गावांमध्ये तिलारी धरणाचे पाणी सोडल्याने पूर येत असतो. शासनाने याकडे लक्ष द्यावे, असे मत गावकर्‍यांनी व्यक्त केले.