१. प्रवासात परात्पर गुरु डॉक्टर चालक-साधकाच्या मागील आसनावर बसणे आणि याद्वारे ते ‘अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून चालकाचे रक्षण करत आहेत’, असे जाणवणे
‘एकदा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासमवेत गोवा ते देवद, पनवेल’, असा प्रवास केला. आम्ही त्यांच्या ‘टाटा इस्टेट’ या पिवळ्या गाडीतून गेलो. गाडीत परात्पर गुरु डॉक्टर चालकाच्या मागे बसले होते. त्या वेळी ‘ते चालक-साधकावर होणार्या सूक्ष्म अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून त्याचे रक्षण करत होते’, असे जाणवले. नंतर कळले की, ते प्रत्येक प्रवासाच्या वेळी चालक-साधकाच्या मागेच बसतात. त्यांच्या संतभेटी, विविध भागांतील साधकांना मार्गदर्शन करणे, विविध संप्रदायांचे संघटन करणे, सार्वजनिक (जाहीर) सभा घेणे आदी पुष्कळ मोठ्या ईश्वरी कार्याला अनिष्ट शक्तींचा विरोधही तेवढ्याच अधिक प्रमाणात होत असतो. त्यामुळे ‘चालक-साधकाचे रक्षण व्हावे’, यासाठी प्रवासात ते बराच वेळ पाय लांब करून बसत. खरेतर त्यांची ही कृती नैसर्गिक असायची; पण परिणाम आध्यात्मिक स्तरावर होत असे.
२. चालक गाडी चालवतांना त्याला मध्येच झोप येऊ नये; म्हणून चॉकलेटचे वेष्टन काढून चॉकलेट त्याच्या तोंडात भरवणे
गाडी चालवणार्या चालकाच्या स्थितीकडे परात्पर गुरु डॉक्टरांचे सतत लक्ष असायचे. त्याला झोप येऊ नये; म्हणून ते चॉकलेट देत. गाडी चालवतांना ‘तो चॉकलेटचे वेष्टन कसे काढणार ?’; म्हणून ते वरचा कागद काढून देत. एवढेच नव्हे, तर त्याचे हात चिकट होऊ नयेत; म्हणून काही वेळा चॉकलेट त्याच्या तोंडाजवळ नेऊन भरवत.
३. दुपारच्या वेळी प्रवास करतांना ‘साधिकेला ऊन लागू नये’; म्हणून झोपेतून उठून स्वतःच गाडीच्या खिडकीला ‘सन प्रोटेक्टिंग शील्ड’ लावणारी गुरुमाऊली !
प्रवास करत असतांना दुपारची वेळ झाली. त्यांना डोळा लागला आणि ते शांत झोपले. मी दुसर्या खिडकीजवळ बसले होते. अकस्मात् त्यांनी डोळे उघडले आणि माझ्या बाजूच्या खिडकीला ‘सन प्रोटेक्टिंग शील्ड’ (उन्हापासून रक्षण होण्यासाठी गाडीच्या खिडकीच्या काचेवर लावण्याची जाळी) लावली अन् ते शांतपणे झोपले. झोपेत असतांनाही ‘आपल्या साधकांना त्रास होऊ नये’, ही जाणीव केवळ गुरुमाऊलीलाच असू शकते !
४. पुष्कळ लांबचा प्रवास करतांना वाटेत साधकांना १५ ते ३० मिनिटे भेटून पुढे जाणे
प्रवासाचा लांबचा पल्ला असल्याने आणि पुढील नियोजन निश्चित असल्याने परात्पर गुरु डॉक्टर वाटेतील काही भागांतील साधकांना भेटण्यासाठी काही ठिकाणी १५ ते ३० मिनिटे थांबायचे. त्यामुळे साधकांना पुष्कळ आनंद मिळायचा. गुरुमाऊली सतत आपल्या साधकांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्नरत असतात.
५. गाडीतील मोकळ्या जागेचा पुरेपूर वापर करून साधकांसाठी अधिकाधिक साहित्य नेणे
परात्पर गुरु डॉक्टर लांबचा प्रवास नेहमी चारचाकी गाडीने करत. या गाडीत अधिकाधिक सामान ठेवलेले असायचे, उदा. प्रसारसाहित्य, इतर केंद्रांतील ‘पार्सले’, साधकांना द्यावयाच्या भेटवस्तू आणि खाऊ. या सर्व साहित्याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना इत्थंभूत माहिती असायची. ‘कुणाला काय द्यायचे आहे ?’, हे त्यांच्या स्मरणात असायचे.
६. दंतवैद्यांकडे नेणार्या चालक-साधकाचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी स्वतः वाचन साहित्य घेऊन जाणे
एक चालक-साधक परात्पर गुरु डॉक्टरांसमवेत बर्याच वेळा दंतवैद्यांकडे जात. तिथे गेल्यावर त्यांना काही वेळ बाहेर बसावे लागे. त्या वेळी त्यांचा वेळ सत्कारणी लागावा; म्हणून परात्पर गुरु डॉक्टर काही वाचन साहित्य समवेत आणत आणि स्वतः दंतवैद्याकडे आत जातांना त्यांना ते वाचायला देत.’
‘परात्पर गुरु डॉक्टर इतरांचा किती विचार करतात !’, हे मला यातून शिकता आले, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०२१)
|