बाणावली समुद्रकिनार्‍यावर २ अल्पवयीन मुलींवर पोलीस असल्याचा बहाणा करून बलात्कार : चारही संशयित पोलिसांच्या कह्यात

बलात्कार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासमवेतच समाजाला धर्मशिक्षण आणि युवतींना स्वरक्षण प्रशिक्षण यांची नितांत आवश्यकता !

संशयितांना नेताना पोलीस

मडगाव, २६ जुलै (वार्ता.) – पोलीस असल्याचा बहाणा करून ४ व्यक्तींनी २५ जुलैच्या रात्री बाणावली समुद्रकिनार्‍यावर २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारही संशयितांनी घटनेचे चित्रीकरण करून ते सामाजिक माध्यमात प्रसारित करण्याची (‘व्हायरल’) धमकी देऊन अल्पवयीन मुलींकडून भ्रमणभाषवर संदेश पाठवून ४० सहस्र रुपयांची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी आसिफ हथेली (वय २१ वर्षे, रहाणारा हाऊसिंग बोर्ड, मडगाव आणि गजानंद चिंचाणकर (वय ३१ वर्षे), राजेश माने (वय ३३ वर्षे) आणि नितीन येब्बाळ (वय १९ वर्षे) सर्व रहाणारे दवर्ली, मडगाव यांना कह्यात घेतले आहे. पीडित दोन्ही अल्पवयीन मुलींचे वय अनुक्रमे १४ आणि १६ वर्षे आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुले आणि मुली मिळून एकूण १० जणांचा एक गट २५ जुलैच्या रात्री बाणावली समुद्रकिनार्‍यावर गेला होता. त्यानंतर यातील २ मुली आणि ३ मुले रात्री उशिरापर्यंत समुद्रकिनार्‍यावर थांबली आणि उर्वरित ५ जण त्यांच्या घरी परतले. उत्तररात्री सुमारे ३ वाजता पोलीस असल्याचा बहाणा करून ४ संशयितांनी ३ मुलांना मारहाण करून दोन्ही मुलींना अन्यत्र नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलींनी याविषयीची माहिती पोलिसांना दिल्यावर संशयितांना कह्यात घेण्यात आले.