गडचिरोली येथे पोलिसांकडून भूमीत पुरलेली स्फोटके नष्ट !

स्फोटके आणि इतर साहित्य यांचा साठा जप्त !

कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयशच !

गडचिरोली – येथे २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवाद्यांकडून ‘हुतात्मा सप्ताह’ पाळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर घातपाताचा मोठा डाव उधळून लावण्यात येथील पोलिसांना यश आले आहे. कुरखेडा तालुक्यातील लवारी अरण्य परिसरातील भूमीत नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेली स्फोटके आणि इतर साहित्य पोलिसांच्या ‘सी-६०’ सैनिकांनी जप्त केल्याने मोठा अनर्थ टळला.

‘सी-६०’चे सैनिक लवारी अरण्य परिसरात ‘नक्षलविरोधी अभियान’ राबवत असतांना त्यांना तेथे लपवून ठेवलेला शस्त्र आणि स्फोटके यांचा साठा आढळून आला. कुकर ‘बॉम्ब’ सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले असून इतर साहित्य येथे आणण्यात आलेले आहे. ‘सी-६०’ सैनिकांच्या कामगिरीविषयी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथकाचे कौतुक केले आहे, तसेच जिल्ह्यात ‘नक्षलविरोधी अभियान’ तीव्र करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.