साधनेची तीव्र तळमळ असल्याने केवळ १० मासांत ‘वाचक ते कृतीशील धर्मप्रेमी’ हा साधनेचा प्रवास करणार्‍या पुणे येथील धर्मप्रेमी सौ. स्वाती शिंदे !

पुणे येथील ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी सौ. स्वाती शिंदे यांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न अन् त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. स्वाती शिंदे

१. ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्गाला नियमित उपस्थित रहाणे

‘सौ. स्वाती शिंदे सात्त्विक उत्पादनांच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आल्या. त्या जिज्ञासूंसाठी असलेला भाववृद्धी सत्संग नियमित ऐकू लागल्या. त्यानंतर दळणवळण बंदीच्या काळात चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्गात त्या सहभागी होऊ लागल्या.

२. विविध माध्यमांतून सांगितलेली साधनेची सर्व सूत्रे तत्परतेने कृतीत आणणे

धर्मप्रेमी महिलांसाठी प्रतिदिन होणार्‍या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सौ. स्वातीताई सहभागी होऊ लागल्या आणि त्यांचे व्यष्टी अन् समष्टी साधनेचे प्रयत्न पुष्कळ वाढले. आता त्यांच्या प्रयत्नांमध्ये सातत्य असते. ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग आणि व्यष्टी साधनेचा आढावा यांत सांगितलेली, तसेच विविध कार्यशाळांतून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सांगितलेली सर्व सूत्रे त्यांनी तत्परतेने कृतीत आणली.

३. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने करणे

सौ. स्वातीताई स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने राबवतात. ‘घरातील प्रसंगांत उफाळून येणार्‍या स्वभावदोषांवर कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी विचारून घेऊन त्या तळमळीने प्रयत्न करतात. स्वभावदोष निर्मूलन सारणीमध्ये लिहिलेल्या चुकांवर ‘स्वयंसूचना योग्य लिहिली आहे ना ?’, हे त्या वर्गसेवकांकडून तपासून घेतात.

३ अ. स्वतःकडून झालेल्या चुकीसाठी गुरुदेवांकडे १०८ वेळा क्षमायाचना करणे आणि त्या वेळी त्यांना पांढरा प्रकाश अन् मोरपीस दिसणे : काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडून एक चूक झाली. त्याची त्यांना तीव्र खंत वाटली. ‘माझ्याकडून अशी चूक कशी झाली ?’, या विचाराने त्या रात्री उशिरापर्यंत रडत होत्या. त्यांनी प.पू. गुरुदेवांना चुकीविषयी आत्मनिवेदन केले. त्यांनी सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांचे चरण घट्ट धरले आणि ‘जोपर्यंत तुम्ही मला क्षमा करणार नाही, तोपर्यंत मी तुमची क्षमा मागत रहाणार’, असे म्हणत १०८ वेळा क्षमायाचना केली. तेव्हा त्यांना पांढरा प्रकाश आणि मोरपीस दिसले. त्यानंतर त्यांनी क्षमायाचना करणे थांबवले. त्यांनी त्या चुकीवर स्वतः कठोर प्रायश्चित्त घेतले. ‘अशी चूक पुन्हा होऊ नये’, यासाठी त्या सतर्क राहून प्रयत्न करतात.

४. साधनेची तीव्र तळमळ

सौ. स्वातीताई अभ्यास करून विषय मांडतात. त्या प्रवचने, तसेच सभा, परिसंवाद अशा कार्यक्रमांचा तळमळीने प्रसार करतात. भाववृद्धी सत्संगाची लिंक इतरांना पाठवून त्याचा आढावाही घेतात. त्यांनी ‘वाचक ते कृतीशील धर्मप्रेमी’ हा साधनाप्रवास केवळ १० मासांमध्ये केला आहे. ‘मला साधनेचे महत्त्व यापूर्वीच समजले असते, तर किती चांगले झाले असते ? आता मला अल्प कालावधीत साधना करून जलद गतीने पुढे जायचे आहे’, अशी त्यांची तळमळ असते.

५. सौ. स्वातीताईंमध्ये परात्पर गुरुदेवांविषयी दृढ श्रद्धा आणि कृतज्ञताभाव जाणवतो.

६. साधनेत आल्यावर झालेले पालट

साधनेत येण्यापूर्वी त्यांना लहान गोष्टींचाही पुष्कळ ताण यायचा. त्यावर त्यांनी चांगले प्रयत्न केले. त्या सांगतात, ‘‘आता मला कोणत्याही गोष्टीचा ताण येत नाही. मला आतून पुष्कळ आनंद जाणवतो आणि भगवंताप्रती कृतज्ञता वाटते.’’

७. ‘देवाला थोडे जरी आळवले, तरी देव तत्परतेने साहाय्याला धावून येतो’, याविषयी सौ. स्वाती शिंदे यांना आलेली अनुभूती

७ अ. रात्री डोके दुखत असतांना श्रीकृष्णाला शरण जाऊन आत्मनिवेदन करतांना रडू येणे, डोळ्यांवर हात ठेवून रडत असतांना कुणीतरी अलगद हात बाजूला काढणे आणि त्यानंतर डोकेदुखी पूर्णपणे थांबून गाढ झोप लागणे : फेब्रुवारी २०२१ मध्ये एका मध्यरात्री सौ. स्वातीताईंचे डोके पुष्कळ दुखत होते. बाम लावूनही डोकेदुखी थांबत नव्हती. त्यामुळे त्यांना झोपही येत नव्हती आणि काही सुचतही नव्हते. त्यांनी अंथरुणावर पहुडलेल्या स्थितीतच श्रीकृष्णाला शरण जाऊन आत्मनिवेदन केले. मनातील सर्व विचार भगवान श्रीकृष्णाला सांगितले. तेव्हा त्यांना रडू येऊन दोन्ही हात डोळ्यांवर ठेवून रडतच त्या श्रीकृष्णाला आत्मनिवेदन करू लागल्या. काही क्षणांनंतर त्यांना ‘कुणीतरी त्यांचे दोन्ही हात डोळ्यांवरून अलगद बाजूला करत आहे’, असे जाणवले. त्यांना हाताचा स्पर्श स्पष्ट जाणवला आणि त्यांचे दोन्ही हात बाजूला झाले. नंतर काही सेकंदांतच त्यांची डोकेदुखी पूर्णपणे थांबून त्यांना गाढ झोप लागली आणि सकाळीच जाग आली. ‘देवाला थोडे जरी आळवले, तरी देव तत्परतेने साहाय्याला धावून आला’, याची जाणीव होऊन त्यांची भावजागृती झाली. ‘देव माझ्या समवेत आहे’, याची अनुभूती येऊन त्यांना पुष्कळ आनंद झाला.’

– कु. क्रांती पेटकर, पुणे (४.३.२०२१)                          ०

उत्साही आणि आनंदी असणार्‍या सौ. स्वाती शिंदे !

‘मी सौ. स्वातीताईंशी भ्रमणभाषवर बोलतांना त्या मला पुष्कळ उत्साही आणि आनंदी वाटल्या. मला त्यांच्यात सहजता आणि नम्रता जाणवली. परात्पर गुरुदेवांविषयी बोलतांना त्यांची भावजागृती होत होती. त्यांच्यात गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव आहे. ‘माझी त्यांच्याशी आधीपासून ओळख आहे’, असे मला वाटले.’ – सौ. मनीषा पाठक, पुणे (४.३.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक