शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या २ मात्रांमधील अंतर ३० दिवस करण्याची गोवा शासनाची केंद्राकडे मागणी

असे केले तर वैद्यकीयदृष्ट्या ठरवलेल्या २ मात्रांमधील अंतराला काही अर्थ नाही, असे होणार नाही का ?

पणजी, २१ जुलै (वार्ता.)-  राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याच्या २ मात्रांमधील अंतर ८४ दिवसांऐवजी ३० दिवस करावे, अशी मागणी केंद्रशासनाकडे केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘आम्ही ३० सप्टेंबरपर्यंत १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीची दुसरी मात्रा देण्याचे ध्येय ठेवले आहे, तसेच राज्यात शाळा लवकर चालू करण्याच्या दृष्टीने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी २ मात्रांमधील अंतर घटवण्याची मागणी आम्ही केंद्रशासनाकडे केली आहे. यापूर्वी खलाशांना अशा प्रकारची सवलत देण्यात आली होती. शाळांमध्ये काम करणार्‍या सर्वांचे लसीकरण केल्यानंतर सामाजिक अंतर पाळून कमीतकमी इयत्ता दहावी आणि बारावी यांचे वर्ग चालू करण्याचा विचार आहे. जर केंद्राकडून मान्यता मिळाली, तर आम्ही लगेच शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना दुसरी मात्रा देण्यास प्रारंभ करणार आहोत.’’