पुणे – ‘क्राईम चेक टाईम’ या वेबपोर्टलचे पत्रकार असल्याचे सांगून २ पत्रकारांनी हॉटेल मालकाला तुम्ही अवैधरीत्या मद्य विक्री करत आहात. तेव्हा हे प्रकरण मिटवण्यासाठी १ सहस्र रुपये देण्याची मागणी केली. ती रक्कम स्वीकारून आरोपींनी परमिट रूम मालकाकडूनही पुन्हा ५ सहस्र रुपयांची मागणी केली. यामुळे सतपालसिंह अमरसिंह बग्गा आणि साथीदार महिलेला कह्यात घेतले. या प्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदारांचे शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौकात हॉटेल आणि परमिट रूम आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना कह्यात घेतले. आरोपींकडील ओळखपत्रे आणि वेबपोर्टल संदर्भात अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी सांगितले.