बनावट दस्तावेजाच्या आधारावर लोकांना भूखंडांची विक्री !
फसवणूक करणार्यांकडून लुबाडलेला पैसा वसूल करून घ्यायला हवा !
नागपूर – येथील टेका नाका परिसरातील ‘एस्.जे. एंटरप्रायजेस’कडून बनावट दस्तावेजाच्या आधारावर अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी लोकांनी गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.
१. ‘एस्.जे. एंटरप्रायजेस’चे संचालक परवेज फरीद रिजवी, अनवर फरीद रिजवी, मोहम्मद रिजवान आणि मोहम्मद सद्दाम यांनी वर्ष १९९९ मध्ये बनावट दस्तावेज सिद्ध करून त्या ठिकाणी ‘लेआऊट’ टाकले.
२. त्या वेळी १ भूखंड १० सहस्र रुपयांना २५ लोकांना विकण्यात आला. त्या लोकांनी भूखंडांवर पक्के घर बांधले. काही वर्षांनी शेतीचा मूळ मालक परतला आणि त्यांनी ही भूमी स्वतःहून कुणालाच विकली नसल्याचा दावा केला.
३. त्या भूखंडांवरील घरांमध्ये रहाणार्या लोकांविरुद्ध मूळ मालकाने न्यायालयात अर्ज प्रविष्ट करून भूमीवरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश मिळवले.
४. त्या आदेशान्वये ‘बुलडोझर’ने सर्व घरे पाडण्यात आली. पीडितांनी ‘एस्.जे. एंटरप्रायजेस’च्या संचालकांकडून भूखंडांची हानीभरपाई मागितली असता त्यांच्याकडून त्यांना कोणतेच साहाय्य करण्यात आले नाही.
५. या फसवणुकीविरुद्ध पीडितांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली; पण पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. या प्रकरणातील पीडित रामप्रसाद यादव, शोभा रापर्तीवार आणि इतर लोक यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन स्वतःचे गार्हाणे मांडले. त्यानंतर कपीलनगर येथील पोलिसांनी त्यांची तक्रार स्वीकारली आहे. (वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार मांडल्यावर पोलीस ठाण्यात तक्रार स्वीकारली जाते; मात्र प्रथम तक्रार दिल्यानंतर कोणतीच कारवाई न करणार्या संबंधित पोलीस अधिकार्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. – संपादक)