|
नैसर्गिक आपत्तींमध्ये सर्व प्रकारची शासकीय यंत्रणा ठप्प होते आणि अनेकांना जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. मुंबईतील पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती म्हणजे येत्या संकटकाळाची चाहूलच आहे. अशा स्थितीत आपले रक्षण होण्यासाठी आतातरी ईश्वराची आराधना करा !
मुंबई –१७ जुलैला रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. भूस्खलन, तसेच इमारत कोसळल्यामुळे काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या. चेंबूर येथे दरड कोसळून १७ जणांचा, तर सूर्यनगर (विक्रोळी) येथील एका घरावर दरड कोसळून १० जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील विविध ठिकाणच्या सखल भागांतील शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना रात्रभर पाण्यातच रहावे लागले. रेल्वेस्थानकांमध्ये पाणी शिरल्यामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गांवरील लोकल वाहतूक, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्याही बंद ठेवण्यात आल्या. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती.
चेंबूर येथील भारतनगर येथे १७ जुलैच्या मध्यरात्री १२.३० ते १ वाजण्याच्या कालावधीत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या काही घरांवर दरड कोसळली. पावसाच्या पाण्याचा उपसा करतांना तेथील भिंतही कोसळली. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे सैनिक घटनास्थळी पोचले असून ढिगार्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांसाठी केंद्रशासनाकडून प्रत्येकी २ लाख रुपयांचे, तर घायाळ व्यक्तींसाठी ५० सहस्र रुपये इतके अर्थसाहाय्य घोषित केले आहे. राज्यशासनाने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ५ लाख रुपये अर्थसाहाय्य घोषित केले आहे. पवई आणि चांदिवली येथेही दरड कोसळून २ जण घायाळ झाले.
#MumbaiRain live updates: IMD issues red alert in city; CM Uddhav Thackeray to chair high-level meeting
Live Updates 👇https://t.co/paZICS2JMJ pic.twitter.com/sYmYPWgHGu
— The Times Of India (@timesofindia) July 18, 2021
भांडुप येथे भिंत कोसळून मुलाचा मृत्यू !
भांडुपमधील अमरकोट येथे भिंत कोसळून १६ वर्षीय सोहम थोरात याचा मृत्यू झाला. पावसामुळे घरात शिरलेले पाणी बाहेर काढत असतांना ही दुर्घटना घडली. स्थानिकांनी सोहमला बाहेर काढले; मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
अनेक रेल्वेस्थानकांमध्ये, तसेच रेल्वेमार्गावरही पाणी शिरले !
रेल्वे स्थानकांमध्ये पाणी शिरल्यामुळे १८ जुलैच्या पहाटे ५ वाजता मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूकही बंद करावी लागली. मध्य रेल्वेमार्गावरील दादर, परळ, शीव, कुर्ला, भांडुप येथील स्थानकांमध्ये पाणी साचल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे अशी रेल्वे वाहतूक बंद केली. हार्बर रेल्वेमार्गावरील वडाळा, चुनाभट्टी, टिळकनगर, कुर्ला स्थानकांत पाणी शिरल्याने रुळ पाण्याखाली गेले. मुंबईकडे येणार्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या थांबवण्यात आल्या, तर काही गाड्या रहित केल्या. मुंबईकडे येणार्या गाड्या दादर, मनमाड, पुणे, कल्याण, इगतपुरी, दिवा, देवळाली आदी स्थानकांमध्ये थांबवण्यात आल्या.
पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही ठप्प !
हिंदमाता, शीव, किंग्ज सर्कल, कुर्ला आदी सखल भागांतील रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. हिंदमाता येथे साचलेले पाणी पंपाद्वारे काढले.
शेकडो घरात शिरले पावसाचे पाणी !
मुंबईतील कांदिवली (पूर्व) येथील हनुमाननगर, गोरेगाव, मालाड, दहिसर येथील रावळपाडा, घरटनपाडा, पेणकरपाडा आदी अनेक ठिकाणच्या शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे अनेक नागरिकांना रात्रभर पाण्यात रहावे लागले. नागरिकांना घरांतील पाणी बाहेर काढण्याची मोठी कसरत करावी लागली. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
वसई येथे मिठागराच्या भोवती पाणी साठले !
पालघर जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. विरार येथे जाधवपाडा भागात नाल्याचे पाणी शिरल्याने घरांमध्ये अडकलेल्या ८० जणांना अग्नीशमन दलाच्या सैनिकांनी सुखरूप बाहेर काढले. वसई मिठागराच्या भोवतीही पाणी साठले होते.
मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात येणार ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनांत मृत्यू पावलेल्यांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात येतील आणि घायाळ झालेल्यांवर विनामूल्य उपचार केले जातील’, असे त्यांनी घोषित केले आहे. ‘एन्.डी.आर्.एफ्., महानगरपालिका, अग्नीशमन दल आणि पोलीस यांनी समन्वय ठेवून आपतग्रस्तांना वाचवण्याचे कार्य चालू ठेवावे अन् घायाळ झालेल्यांना तातडीने रुग्णालयांत हालवून व्यवस्थित उपचार मिळतील, असे पहावे’, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मुंबईत रात्रभर पडलेला पाऊस भीतीदायक ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील दुर्घटना घडलेल्या भागांची पहाणी केली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘मुसळधार पाऊस ही जरी नैसर्गिक घटना असली, तरी एवढा पाऊस पडणे अनैसर्गिक आहे. मुंबईत रात्रभर पडलेला पाऊस भीतीदायक होता. समुद्र किनार्यावरील भागांना धोका अधिक आहे.’’
भांडुप जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी साचल्याने मुंबईतील अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा ठप्प !मुंबईच्या बहुतेक भागांमध्ये पाणीपुरवठा करणार्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी साचल्यामुळे ते बंद पडले. तेथील पंप आणि अन्य यंत्रसामग्री बंद करावी लागली. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणीच आले नाही. पाणीपुरवठा पूर्ववत् करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. |