पुणे – गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेशद्वार) उड्डाणपूल पाडून एक वर्ष पूर्ण झाले, तरी हिंजवडी मेट्रोचे काम चालू झाले नाही. येथे होणार्या नवीन बहुमजली पुलाच्या आराखड्यालाही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. येथील बहुमजली पुलाचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (‘पी.एम्.आर्.डी.ए.’ने) तातडीने चालू करावे, अशी मागणी होत आहे. (कामात दिरंगाई म्हणजे जनतेने कररूपी भरलेल्या पैशाचा वर्षभर झालेला अपव्ययच ! संबंधित अधिकार्यांनी उपाययोजना काढावी. – संपादक)
पुलाचा आराखडा सिद्ध होऊनही पुणे महापालिकेने त्याला मान्यता दिलेली नाही. तसेच पुलाच्या प्रस्तावित आराखड्याची संकल्पचित्रे देण्याची मागणी करूनही पी.एम्.आर्.डी.ए. कडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.