नियम मोडणार्या अशा नागरिकांमुळेच कोरोना आटोक्यात येत नाही. असे नागरिक स्वतःसह इतरांचेही आयुष्य धोक्यात घालत आहेत.
नगर, १४ जुलै – येथील पारनेर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडत असल्यामुळे २१ गावांमध्ये दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. असे असतांनाही पारनेरजवळ गणपती फाटा येथील ‘गौरीनंदन मंगल कार्यालया’त ५० लोकांसाठी अनुमती घेऊन ३०० लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा चालू होता. याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार ज्योती देवरे तेथे गेल्या. अनेकांनी मास्कही लावलेले नव्हते. त्यामुळे देवरे यांनी ‘माईक’ हातात घेऊन सर्वांनाच खडे बोल सुनावले. ‘सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे’, असे आवाहनही त्यांनी केले.
गर्दी होण्यास मंगल कार्यालय चालकास उत्तरदायी धरून १० सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापुढे असा प्रकार पुन्हा आढळून आल्यास थेट गुन्हा नोंद करण्याची तंबीही मंगल कार्यालय चालकाला देण्यात आली. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने काही स्थानिकांनी मुंबईकरांना उत्तरदायी ठरवण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईहून पारनेरला येणार्यांचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांचे म्हणणे होते; मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा बैठकीत ते फेटाळून लावले होते. स्थानिक ग्रामस्थच आता नियम मोडत असल्याचे दिसून येत आहे.