सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला अंमलबजावणी संचालनालयाकडून कोणतीही नोटीस नसून कर्जाची माहिती मागवली आहे ! – सतीश सावंत, अध्यक्ष

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (जिल्हा बँकेला) अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडीकडून) कोणत्याही प्रकारची नोटीस आलेली नाही; मात्र बँकेने दिलेल्या कर्जाची माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत असलेला जिल्हा बँकेला अपकीर्त करणारा संदेश खोटा आहे. नाहक कुणी बँकेच्या खातेदारांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्टीकरण जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांनी दिले आहे.

१२ जुलैला दिवसभर सामाजिक माध्यमांतून ‘जिल्हा बँकेला ‘ईडी’ची नोटीस’, असा संदेश प्रसारित होत होता. त्या पार्श्वभूमीवर सावंत म्हणाले, ‘‘मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कर्ज थकित झाल्याने थकित कर्जाच्या वसुलीसाठी सातारा जिल्ह्यातील चिमणगाव, तालुका कोरेगाव येथील ‘जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना’ ‘सिक्युरिटायझेशन ॲक्ट’अंतर्गत कह्यात घेऊन त्याचा जाहीर लिलाव करण्यात आला. या प्रक्रियेद्वारे मे. गुरु कमोडिटीज सर्व्हिसेस प्रा.लि., मुंबई यांनी हा कारखाना खरेदी केला आहे. हा कारखाना खरेदी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (जिल्हा बँकेने) थेट अगर सहभागातून कोणताही कर्जपुरवठा केलेला नाही. जिल्हा बँकेने यांत्रिक आधुनिकीकरण आणि सहवीज निर्मिती अन् इथेनॉल प्रकल्पासाठी कर्जपुरवठा केलेला आहे. या कर्जाची सर्व वसुली अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे. बँकेने दिलेल्या कर्जासाठी पुरेसे तारण घेण्यात आलेले असून जून २०२१ अखेरपर्यंत कर्जाची वसुली नियमित झाली आहे. त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वांच्या ठेवी सुरक्षित आहेत.’’