देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांसाठी आधारस्तंभ असलेले सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरीकाका !

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. 

साधकांनो, ‘सनातन’चे आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संत हे केवळ संत नाहीत, तर गुरुच असल्याने त्यांच्याकडून शिका अन् ते कृतीत आणून त्यांचा खर्‍या अर्थाने लाभ करून घ्या आणि साधनेत शीघ्र गतीने पुढे जा !

‘आतापर्यंत सनातनचे आणि सनातनच्या शिकवणीप्रमाणे साधना करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे मिळून १११ साधक संत झाले आहेत. यांतील काहीजण ठिकठिकाणी जाऊन साधकांना साधनेसंदर्भात अगदी देहत्याग होईपर्यंत मार्गदर्शन करतात. आपण त्यांना ‘समष्टी संत’ म्हणतो. त्यांचे कार्य गुरूंप्रमाणेच साधनेत मार्गदर्शन करण्याचे आहे; म्हणून त्यांची माहिती सर्व साधकांना व्हावी आणि साधकांना संतांकडून काहीतरी शिकायला मिळावे, यासाठी त्यांच्याविषयीचे जागेनुसार काही लिखाण ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करत आहोत. त्या माहितीत काही संत आणि साधक यांनी लिहिलेली संतांची गुणवैशिष्ट्ये, शिकवण, त्यांच्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती, त्यांनी स्वतःविषयी, कुटुंबियांविषयी, इतर साधकांविषयी आणि संतांविषयी लिहिलेले लिखाण, त्यांनी केलेल्या कविता किंवा त्यांच्यावर इतर साधकांनी केलेल्या कविता इत्यादी विषयांवर लिखाण आहे. हे लिखाण वाचून त्यांच्याविषयी सर्वांनाच जवळीक वाटण्यास साहाय्य होईल आणि जगभरातील सर्वच साधकांना त्यांची तोंडओळख होईल. संतांची वैशिष्ट्ये केवळ वाचू नका, तर ती स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या लेखमालेचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आज आपण देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरी यांच्याविषयी साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि पू. गडकरीकाका यांना आलेल्या अनुभूती येथे पाहूया ! 

पू. रमेश गडकरी

१. सेवेत साहाय्य करणे

‘देवद आश्रमातील पू. रमेश गडकरीकाका सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांच्या संदर्भातील सेवा करतात.

पू. काका साधकांना सेवेत साहाय्य करतात आणि साधकांना सेवा करण्यास प्रोत्साहन देतात. ते साधकांना सेवेत येणार्‍या अडचणींवर उपाय सुचवून काही क्षणांतच त्या अडचणी सोडवतात.  आमच्याकडून फलनिष्पत्तीपूर्ण सेवा करवून घेतात.

२. परिपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण सेवा करण्याची तळमळ

अ. पू. काका साधकांना केवळ सेवा सांगून थांबत नाहीत, तर ‘सेवा करतांना साधकांकडून काही चूक होत नाही ना ? साधकांकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी सेवा होत आहे ना ?’, याकडेही त्यांचे लक्ष असते. काही वेळा आवश्यकता असल्यास पू. काका स्वतःच ती सेवा परिपूर्ण होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करतात. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच आम्हा साधकांमध्ये वावरत आहेत’, असे आम्हाला वाटते.

आ. पू. काकांकडून ‘परिपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण सेवा कशी करावी ?’, हे मला शिकायला मिळते. सनातन-निर्मित गोमूत्र अर्क, अष्टगंध, कुंकू, अत्तर इत्यादी उत्पादनांचा दर्जा आणि त्यासाठी लागणारे बांधणीचे (पॅकिंगचे) साहित्य, उदा. डब्या, बाटल्या, खोकी, उत्पादनांच्या वेष्टनांवर असलेले छपाईचे पत्रक हे सर्व उत्तम प्रतीचे असावे, यासाठी पू. काका प्रयत्नरत असतात.

३. साधकांची आस्थेने विचारपूस करणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे

श्री. कृष्णकुमार जामदार

पू. काका सेवेत व्यस्त असतांनाही साधकांची काळजी घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस करतात. ते साधकांना नामजपादी उपाय सांगून धीर देतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवतात. साधकांनी परिपूर्ण सेवा केल्यास पू. काका त्यांचे कौतुक करतात.

पू. काका साधकांशी प्रेमाने बोलत असतांना खळखळ वहाणार्‍या झर्‍यासारखे त्यांचे बोल जाणवतात.

पू. गडकरीकाकांचा साधकांच्या पाठीवरून फिरणारा प्रेमाचा अदृश्य हात आणि डोळ्यांतून सतत वहाणारा प्रीतीभाव पाहिल्यावर ‘त्यांनी हे गुरुमाऊलींकडून आशीर्वादरूपात प्राप्त करून घेतले आहे’, याची जाणीव होते.

 ४. साधकांचे आधारस्तंभ असलेले पू. गडकरीकाका !

पू. गडकरीकाका आम्हा साधकांसाठी आधारस्तंभ आहेत. सेवेच्या ठिकाणी कोणतीही समस्या निर्माण झाल्यास पू. काकांची आठवण येते. पू. काकांच्या समवेत सेवा करतांना मला त्यांच्याकडून ‘प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करणे, सेवा करतांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे, स्वतः क्रियाशील राहून सहसाधकांकडून सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करवून घेणे, प्रसंगानुरूप साधकांना मार्गदर्शन करणे’ इत्यादी अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पू. काकांनी साधकांना दिलेले प्रेम आणि वात्सल्य अन् सर्व साधकांना समवेत घेऊन सेवा परिपूर्ण करण्याची त्यांची क्षमता यांमुळे पू. काकांची एक आदर्श प्रतिमा डोळ्यांसमोर उभी रहाते. उत्पादन सेवेतील साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्यात पू. गडकरीकाकांचे मोठे योगदान आहे.

‘पू. गडकरीकाका यांच्यासारखे प्रेमळ संत आम्हास लाभले’, यासाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांची पुढची प्रगती जलद होऊ दे’, अशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. कृष्णकुमार जामदार, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक