आंदोलकांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन !
अकोला – पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ ६ जुलै या दिवशी येथील भाजप युवा मोर्च्याच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महाविकास आघाडी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन करण्यात आले, तसेच भाजपचे शहराध्यक्ष विजय अग्रवाल आणि महापौर अर्चना मसने यांच्या नेतृत्वाखाली ‘रस्ता बंद’ आंदोलन करून सरकारचा निषेधही करण्यात आला. या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात निदर्शने केली. राज्य सरकारने केलेली ही निलंबनाची कारवाई आकसापोटी केल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकार्यांनी केला. या वेळी आंदोलकांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले.
परभणी येथे भाजपची निदर्शने आणि पुतळा दहन करण्यावरून तणाव !
परभणी – विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित केल्याच्या निषेधार्थ ६ जुलै या दिवशी येथे परभणी महानगर भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निदर्शने करण्यात आली. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला; परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांकडून हा पुतळा हिसकावून कह्यात घेतला. पुतळा ओढाओढीच्या प्रकारामुळे पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता. आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, सुनील देशमुख, समीर दुधगावकर यांच्यासह अनुमाने ६० कार्यकर्त्यांना कह्यात घेतले आहे. परभणी येथेही आंदोलकांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले.