वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संबंधित आरोपींना तत्परतेने कठोर शासन होणे आवश्यक !
नागपूर – शहरात बनावट फेसबूक खाते सिद्ध करून ३ प्रतिष्ठित व्यक्तींना मनस्ताप देण्यात आला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी तक्रारी नोंदवून अन्वेषण चालू केले आहे. ३ व्यक्तींमधील १ जण नामांकित आस्थापनात नोकरीला आहे, तर एक जण सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत असून दुसरी व्यक्ती सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठित आहे. बनावट खात्यांवर आक्षेपार्ह माहिती असल्याचे ओळखीच्या लोकांनी कळवल्यावर तिघांनाही धक्का बसला. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. तिन्ही तक्रारींविषयी बनावट ‘आयडी’चा वापर कसा झाला, याचा शोध ‘सायबर’ पोलिसांकडून चालू आहे.
१. सामाजिक माध्यमांवर अधिक ‘फॉलोईंग’ असणार्या व्यक्तीच्या नावे ‘फेसबूक’ माध्यमावर बनावट खाते सिद्ध करून ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’ विज्ञापन केले जात आहे. त्याद्वारे ‘सेक्स रॅकेट’ही चालवले जात असल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
२. सायबर गुन्हेगार या नवीन पद्धतीने लोकांना जाळ्यात ओढण्याचे काम करत आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाच्या बनावट खात्यांवर ‘जिगेलो’, ‘एसकॉर्ट सर्व्हिस’ देण्यासाठी ‘हायप्रोफाईल’ व्यक्तींचे छायाचित्र आणि धड वेगळे वापरून छायाचित्र ‘एडिट’ केले जाते. त्यावर भ्रमणभाष क्रमांक देऊन दूरभाष करायला लावतात.
३. मग यात आंबटशौकिनांना दूरभाषवर गुंतवले जाते. पैसे दिले, तर ‘एसकॉर्ट सर्व्हिस’च्या नावावर वाटेल ते पुरवण्याचे आमीष देत त्यांना जाळ्यात ओढले जाते.
४. अनेकांसमवेत असे प्रकार घडल्यावर काही जण स्वतःचे खाते काढून टाकतात; मात्र बनावट फेसबूक खाते तसेच रहाते. यासाठी सायबर पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास नावाचा वापर करणे थांबवले जाऊ शकते.
५. अपर्कीतीची भीती न बाळगता सायबर पोलिसांचे साहाय्य घ्यावे. स्वतःच्या भ्रमणभाषमधील काही ठिकाणी ‘प्रायव्हसी सेटिंग’ करून, तसेच स्वतःविषयीची महत्त्वपूर्ण माहिती सार्वजनिक न करता ती ‘हाईड’ करून ठेवावी. यातूनच वरील प्रकारांना आळा बसेल.