विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय क्षमता विकसित करण्यासाठी सेतू अभ्यासक्रम विकसित !

मराठी आणि उर्दू माध्यमांतून अभ्यासक्रम उपलब्ध तर इंग्रजी अन् सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचे काय ? असा प्रश्न उपस्थित !

पुणे – राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या मागील शैक्षणिक वर्षातील विषयनिहाय क्षमता विकसित करण्यासाठी मराठी आणि उर्दू या माध्यमांतून सेतू अभ्यासक्रम उपलब्ध केला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया विस्कळीत झाली होती. ‘ऑनलाईन’ शिक्षण सर्वच स्तरांतील विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने त्यांच्या अध्ययनात काही त्रुटी असण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एस्.सी.ई.आर्.टी.) सेतू अभ्यासक्रम विकसित केला आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन कृतीपत्रिका सोडवून घेतल्या जाणार आहेत. याच धर्तीवर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम उपलब्ध करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून करण्यात येत आहे.

इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सिद्ध करण्याचे काम चालू आहे. अभ्यासक्रम उपलब्ध झाल्यावर ४५ दिवसांत तो राबवण्यात यावा, असे एस्.सी.ई.आर्.टी.चे संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.