|
मुंबई, १ जुलै (वार्ता.) – शासनाने सर्व पारमार्थिक क्षेत्रे बंद केली आहेत. मंदिरे, कीर्तने, भजने, नामसप्ताह आदी बंद आहेत; मात्र राजकीय मेळावे, पुढार्यांची सभा, जेवणावळ्या बिनबोभाट चालू आहेत. असे असतांना केवळ वारीवर बंधने घालणे आम्ही मान्य करू शकत नाही. शासन वारकर्यांना आतंकवादी म्हणू देत किंवा शिरजोर; पण या वर्षी वारकरी शासनाची भूमिका ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत, अशी भूमिका संतवीर बंडातात्या कराडकर यांनी समस्त वारकर्यांच्या वतीने मांडली. ३ जुलै या दिवशी आळंदी येथून वारकरी प्रचंड संख्येने पंढरपूर येथे जातील. त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करावी, हे शासनाच्या अधीन आहे. शासन शेवटच्या क्षणापर्यंत वारीला अनुमती देत नसेल, तर शासनाकडे वारकर्यांच्या प्रक्षोभाला सामोरे जाण्याविना कोणताही पर्याय नसेल, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे.
संतवीर बंडातात्या कराडकर पुढे म्हणाले की, पुणे, मुंबई येथे रस्ते गर्दीने तुडूंब भरले आहेत. प्रत्येक बसथांब्यावर प्रवाशांची गर्दी होत आहे. बसमधून ६० हून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. भाजी मंडईत गर्दी होत आहे; पण वारकरी शासनाचे नियम पाळून वारीला जात असतील, तर शासनाला ते का चालत नाही ? आषाढी वारीसाठी २० वारकर्यांच्या संख्येने पालख्या पायी चालत जाण्याची प्रथा मागील वर्षी कोरोनामुळे थांबली. सर्व वारकर्यांनी ही शिस्त पाळली. भावनेला मुरड घालून वारी बंद ठेवली. ‘या वर्षी आणि यापुढेही वारकर्यांनी असेच सहकार्य करावे’, अशी जर शासनाची भूमिका असेल, तर ती भूमिका प्रतिवर्षी मान्य करण्याच्या मन:स्थितीत आम्ही नाही. ‘न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा’, असे शासनाचे कोरोनाविषयीचे निकष आहेत. पायी वारीला जाण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व वारकर्यांना ३ जुलै या दिवशी आळंदी येथे येण्याचे आव्हान केले आहे. तेथे किती वारकरी येतील, हे आम्ही सांगू शकत नाही. अद्यापही शासनाने सर्व पालख्यांना किमान संख्येने पायी चालण्याची अनुमती द्यावी, अशी आमची मागणी आहे.
पूजनीय बंडातात्या कराडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर क्षमा मागावी ! – आध्यात्मिक समन्वय आघाडी, भाजप
मुंबई, १ जुलै (वार्ता.) – वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्म यांच्या रक्षणार्थ स्वत:चे जीवन समर्पित करणार्या पूजनीय बंडातात्या कराडकर या साधू अन् नि:स्पृह व्यक्तीमत्त्वाविषयी अपशब्द वापरल्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर क्षमा मागावी, अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीने केली आहे.
३० जून या दिवशी ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीवर वारीविषयीच्या चर्चासत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता विलास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाचे श्रद्धेय संतवीर बंडातात्या कराडकर यांच्याविषयी निंदनीय वक्तव्य करून वारकर्यांना ‘आतंकवादी’ संबोधले होते. या प्रकरणी भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीने प्रसिद्धपत्रक काढून याचा निषेध केला आहे. या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोणत्याही पक्षाचा अधिकृत प्रवक्ता हा स्वत:च्या पक्षाची बाजू मांडत असतो. प्रत्येकाची मतमतांतरे असू शकतात आणि ती मतेही मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; परंतु कुणाचीही साधना किंवा उपासना यांवर शिंतोंडे उडवण्याचा अधिकार नाही. देव, धर्म, साधू-संत यांविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचा आकस पुन्हा एकदा समोर आला आहे.
‘आतंकवादी’ ठरवून वारकरी संप्रदायाला नष्ट करण्याचे षड्यंत्र चालू नाही ना ? – ह.भ.प. बंडोपंत महाराज मुंडे कोद्रीकर, श्रीक्षेत्र गंगाखेड
मुंबई – वारकरी संप्रदाय हा वटवृक्ष आहे. वारी हा या वटवृक्षाची मोठी फांदी आहे. या फांद्यांची छाटणी चालू आहे. ‘आतंकवादी’ शब्दप्रयोग करून वारकरी संप्रदायाचा वटवृक्ष मूळासह उपटून फेकण्याचे षड्यंत्र चालू नाही ना ? अशी भीती श्रीक्षेत्र गंगाखेड येथील वारकरी ह.भ.प. बंडोपंत महाराज मुंडे कोद्रीकर यांनी व्यक्त केली आहे. वारकर्यांना ‘आतंकवादी’ ठरवण्याचा शब्दप्रयोग प्रसारमाध्यमांतून असाच चालू राहिला, तर नास्तिक आणि पुरोगामी लोकांना एक नामी संधी मिळेल. असे शब्द जाणीवपूर्वक पेरले जात आहेत. निष्ठावान वारकरी मंडळींनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. अन्यथा भविष्यात ‘वारकरी आतंकवाद’ म्हणत ही मंडळी तुमचे गुडाख हे उठवतील, अशी भीती ह.भ.प. बंडोपंत महाराज मुंडे कोद्रीकर यांनी व्यक्त केली.