५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली एशिया पॅसिफिक येथील कु. कल्याणी सजीश (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. कल्याणी सजीश एक आहे !

कु. कल्याणी सजीश हिची आत्या आणि तिचे कुटुंबीय साधना करतात. त्यामुळे कल्याणीच्या आईनेही साधनेला आरंभ केला. कल्याणी मागील ३ वर्षांपासून साधकांच्या संपर्कात आहे. केरळमध्ये वाढदिवस नक्षत्रांनुसार साजरे केले जातात. केरळ येथील पंचांगानुसार ३०.६.२०२१ या दिवशी पूर्वाभाद्रपदा नक्षत्र असून याच दिवशी कु. कल्याणीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. कल्याणी सजीश हिला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. गर्भारपण

‘गर्भधारणा झाल्यावर मला उलट्या होत होत्या. या काळात मला कांदा आणि लसूण यांचा वासही सहन होत नव्हता.

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते १ वर्ष – उत्तम शारीरिक वाढ : कल्याणीने सर्वच प्रगती भराभर केली. ती एक वर्षाची व्हायच्या आत चालायला लागली आणि लवकर बोलायलाही लागली. तिला दातही लवकर आले.

२ आ. वय १ ते ३ वर्षे

२ आ १. चांगली आकलनशक्ती : कल्याणीची आकलनशक्ती फार चांगली असल्याने आम्ही कधी दुःखी असलो, तर ते तिच्या लक्षात यायचे आणि ती ‘काय झाले ?’, असे आम्हाला विचारायची.

२ इ. वय – ३ ते ६ वर्षे : शाळेत कल्याणी इतर मुलांमध्ये सहजतेने मिसळायची नाही. ती आपापली चित्रे काढत बसायची.

२ ई. वय – ६ ते ८ वर्षे

२ ई १. आता कल्याणी सर्वांमध्ये मिसळायला लागली आहे.

२ ई २. तिला प्राणी आणि पक्षी फार आवडतात.

२ ई ३. श्रीकृष्णाप्रती भाव : कल्याणीला देवाशी संबंधित कथा ऐकायला, पहायला आणि इतरांना त्याविषयी सांगायला पुष्कळ आवडते. ती मला नेहमी विचारते, ‘‘कृष्णाने पृथ्वीवर अशा प्रकारे (कारागृहात) जन्म का घेतला ? त्याचे आयुष्य फार दुःखी होते. कृष्ण वृंदावन सोडून मथुरेला का गेला ?’’ ‘कृष्ण वृंदावनातून मथुरेला जायला निघाला’, हे गाणे कल्याणी ऐकते आणि रडते. तिची आता कृष्णभक्ती चालू झाली आहे.

२ ई ४. परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्याची ओढ लागणे : कोरोना महामारीविषयी ऐकल्यावर ती पुष्कळ घाबरली होती. मी तिला म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर आपल्या समवेत आहेत. तू काळजी करू नकोस.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘आता मला त्यांना भेटायचे आहे आणि त्यांच्या समवेत रहायचे आहे.’’ मी तिला सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर नेहमी आपल्या समवेत असतात. तू साधना कर.’’

२ ई ५. स्वभावदोष : आळशीपणा आणि स्वकौतुकाची अपेक्षा करणे.’

–  सौ. बिनुषा सजीश (कु. कल्याणीची आई), एशिया पॅसिफिक (१७.६.२०२१)

प्रेमळ, सत्संगाची आवड आणि श्रीकृष्णाप्रती भोळाभाव असलेली एशिया पॅसिफिक येथील कु. कल्याणी सजीश !

१. जवळीक करणे

‘कल्याणी नेहमी आनंदी असते आणि सर्वांशी पटकन जवळीक करते. कल्याणी केरळ येथील सेवाकेंद्रात पहिल्यांदा आली. तेव्हा ती ५ वर्षांची होती. आम्हा कुणाशीही तिचा परिचय नसतांना ती सर्वांशी प्रेमाने बोलत होती.

२. शास्त्र समजून घेऊन कृती करणे

तिला एखादी गोष्ट समजावून सांगितल्यावर ती ऐकते. एकदा तिला केस मोकळे सोडून शाळेत जायचे होते. तिच्या आईने तिला ‘मुलींनी असे केस मोकळे सोडून जाऊ नये’, असे समजावून सांगितले. त्याची निश्चिती करण्यासाठी कल्याणी आईला म्हणाली, ‘‘आपण प्रणीताताईला विचारूया.’’ आम्ही तिला शास्त्र समजावून सांगितले. तेव्हा तिला ते पटले. आता ती प्रतिदिन शाळेत वेणी घालून आणि कुंकू लावून जाते.

३. चित्रकलेची आवड

कल्याणी छान चित्रे काढते. तिला निसर्ग आणि फुले यांची सात्त्विक चित्रे काढायला आवडतात. तिला कागदाची फुले आणि कलाकृती आवडते.

४. प्रेमळ

अ. कल्याणी एशिया पॅसिफिक येथे रहायला आहे. ‘ती भारतात रहायला येणार’, असे ठरल्यावर तिने आम्हाला विचारले, ‘‘मी तुम्हा सर्वांसाठी काय आणू ?’’

आ. ती आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे; पण तिचे तिच्या आते आणि मामे भावंडांशी छान पटते. ती छोट्या मामेबहिणीला प्रेमाने सांभाळते.

५. स्वभावदोष निर्मूलन सत्संग ऐकून अंतर्मुख होऊन विचार करणे

आम्ही एकदा सत्संगात स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व सांगत होतो. तेव्हा कल्याणी ६ वर्षांची होती. त्या वेळी तिने ‘मला मैत्रिणीचा हेवा वाटतो’, असे सांगून ‘तो कुठल्या प्रसंगात वाटतो ?’, हे सांगितले आणि त्यावर ‘कसे प्रयत्न करू ?’, असे विचारले. ते ऐकून ‘एवढ्या छोट्या कल्याणीला मनाची प्रक्रिया कशी समजली ?’, याचे आम्हाला आश्चर्य वाटले.

६. सत्संगाची आवड

ती ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गाला नियमित उपस्थित रहाते आणि वर्गात सांगितलेले प्रयत्नही करते.

७. भाव

तिच्यात भोळाभाव आहे. श्रीकृष्णाची गाणी ऐकतांना तिच्या डोळ्यांतून भावाश्रू येतात. तिला देवाची पुष्कळ ओढ आहे.’

– कु. प्रणीता सुखटणकर आणि कु. रश्मी परमेश्वरन्, केरळ (१७.६.२०२१)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक