‘साधना’ या विषयावरील शिबिरामध्ये सहभागी झालेल्या शिबिरार्थींचे मनोगत !

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात झालेल्या साधना शिबिरामध्ये सहभागी झालेल्या शिबिरार्थींना जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सनातन आश्रम, रामनाथी

१. आश्रमात आल्यावर माहेरी आल्यासारखे वाटणे

‘आश्रमात आल्यावर मला माहेरी आल्यासारखे वाटले. येथे पुष्कळ प्रेम मिळाले. मला आश्रमातून जावेसे वाटत नाही. ‘येथील साधकांमध्ये असलेला सेवाभाव माझ्यातही रुजावा’, अशी मी प्रार्थना करतो.’

– श्री. रामदास चौधरी

२. निरपेक्ष आणि शरणागतभावाने साधना करून साधकांनी फलकावर लिहिलेल्या स्वतःच्या चुका पाहून तसे प्रयत्न करावेसे वाटणे

‘आश्रम पहातांना निरपेक्ष आणि शरणागतभावाने साधना करणारे साधक पाहून माझ्यातील लीनता वाढली. ‘मलाही अशी सेवा करता येईल का ?’, असा विचार माझ्या मनात सतत येत होता. साधकांनी फलकावर लिहिलेल्या चुका पाहून ‘आपणही असे प्रयत्न करावेत’, असे मला वाटले. ‘साधना करून सूक्ष्म जगताविषयीचे ज्ञान आपल्यालाही अवगत व्हावे’, असा विचार माझ्या मनात आला.’

– सौ. मनीषा भुजबळ, घाटकोपर, मुंबई.

३. आश्रमात विविध गोष्टी शिकायला मिळून हिंदु राष्ट्राचे प्रतिरूप पहाता येणे

अ. ‘आश्रमात येताच शांती आणि चैतन्य यांनी माझे मन आनंदी होऊन निर्विचार झाले.

आ. पुढे येणार्‍या हिंदु राष्ट्राचे प्रतिरूप सनातन आश्रमात पहायला मिळते. ‘आम्ही भारतीय असून हिंदु आहोत’, याविषयी मला लहानपणापासून गर्व आहे. येथे आल्यावर हिंदु धर्मासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असलेले कार्य पाहून मी मनोमन नमस्कार केला. ‘हे कार्य माझ्याकडून होण्यासाठी देवाने मला प्रेरणा द्यावी’, अशी मी प्रार्थना करते.

इ. ‘मोक्ष कसा मिळवायचा आणि त्यासाठी काय करायचे ?’, हे मला ठाऊक नव्हते. त्याचे उत्तर मला येथे मिळाले.

ई. ‘अनिष्ट शक्ती काही करू शकतात’, यावर पूर्वी माझा मुळीच विश्वास नव्हता. शिबिरात याविषयीही पुष्कळ ज्ञान मिळाले. आश्रमात जे शिकले, ते मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करीन.

उ. आश्रम एक परिपूर्ण व्यवस्था आहे. ‘रामनाथी आश्रमात येऊन पूर्ण ऊर्जा घेऊन राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य स्वतः केले पाहिजे अन् या कार्यात दुसर्‍यांनाही जोडले पाहिजे अन् प्रेरणा दिली पाहिजे’, हे मला जाणवले. हे कार्य मलाही करायचे आहे.’

– सौ. मीरा मिश्रा, कल्याण, ठाणे.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक