जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामास निधी अल्प पडू न देण्याचे आश्वासन
संभाजीनगर – जिल्हा क्रीडा संकुलाचे काम संकल्प आणि सिद्धी यांप्रमाणे पूर्ण करा. काही अडचणी आल्यास आम्ही त्या सोडवू. खेळ आणि संकुल यांसाठी पैसा अल्प पडू देणार नाही. कोरोना काळात पुष्कळ वेळ वाया गेला आहे, त्यामुळे वेगाने काम पूर्ण करण्याचे दायित्व संबंधित अधिकार्यांचे आहे. संकुलातील सर्व इमारतींवर मराठी भाषेत नावे लिहावीत, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी येथे केले. चिकलठाणा परिसरातील सावंगी बायपास भागात ३७ एकरमध्ये सिद्ध होणार्या ‘जिल्हा क्रीडा संकुला’चे भूमीपूजन २७ जून या दिवशी झाले, त्या वेळी ते बोलत होते.
सुभाष देसाई पुढे म्हणाले की, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी ज्या काही सूचना असतील त्या सर्वांनी अवश्य द्याव्यात, त्याची पूर्तता आम्ही नक्की करू. शहरातील खेळाडूंमुळे जिल्ह्याचे नाव अभिमानाने घेतले जाईल, असे संकुल उभारण्यात येईल. या संकुलात खेळाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील आणि मोठ्या स्पर्धा घेतल्या जातील. या वेळी देसाई यांना ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’द्वारे संकुलातील विविध भाग दाखवले. त्या वेळी त्यामध्ये असलेली इंग्रजी नावे पाहून त्यांनी अप्रसन्नता व्यक्त केली.
खेळाडू आणि संघटना यांना निमंत्रण नाही !जिल्हा क्रीडा संकुलाच्या भूमीपूजनाचे निमंत्रण जिल्ह्यातील अनेक मोठे खेळाडू आणि विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांना देण्यात आले नव्हते. त्यामुळे उद्घाटनप्रसंगी एकही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित नव्हता. केवळ एक-दोन ‘शिवछत्रपती पुरस्कार’ विजेते उपस्थित होते. तसेच या वेळी पालकमंत्री पोचण्याच्या ५ मिनिटे आधी स्वागत कमानी उभारण्यात आल्या. |