परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणार्‍या पारतखेडा (जिल्हा जळगाव) येथील सनातनच्या ६८ व्या संत पू. (सौ.) केवळबाई पाटील (वय ७९ वर्षे) !

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. 

आज आपण सनातनच्या ६८ व्या संत  पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांचा साधनाप्रवास आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे पाहूया.      

(भाग १)

जन्मदिनांक : १.१०.१९४३

वाढदिवस : आश्विन शुक्ल पक्ष द्वितीया (८.१०.२०२१)

संतपदी विराजमान : २ जुलै २०१७

साधकांनो, ‘सनातन’चे आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संत हे केवळ संत नाहीत, तर गुरुच असल्याने त्यांच्याकडून शिका अन् ते कृतीत आणून त्यांचा खर्‍या अर्थाने लाभ करून घ्या आणि साधनेत शीघ्र गतीने पुढे जा !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘आतापर्यंत सनातनचे आणि सनातनच्या शिकवणीप्रमाणे साधना करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे मिळून १११ साधक संत झाले आहेत. यांतील काहीजण ठिकठिकाणी जाऊन साधकांना साधनेसंदर्भात अगदी देहत्याग होईपर्यंत मार्गदर्शन करतात. आपण त्यांना ‘समष्टी संत’ म्हणतो. त्यांचे कार्य गुरूंप्रमाणेच साधनेत मार्गदर्शन करण्याचे आहे; म्हणून त्यांची माहिती सर्व साधकांना व्हावी आणि साधकांना संतांकडून काहीतरी शिकायला मिळावे, यासाठी त्यांच्याविषयीचे जागेनुसार काही लिखाण ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करत आहोत. त्या माहितीत काही संत आणि साधक यांनी लिहिलेली संतांची गुणवैशिष्ट्ये, शिकवण, त्यांच्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती, त्यांनी स्वतःविषयी, कुटुंबियांविषयी, इतर साधकांविषयी आणि संतांविषयी लिहिलेले लिखाण, त्यांनी केलेल्या कविता किंवा त्यांच्यावर इतर साधकांनी केलेल्या कविता इत्यादी विषयांवर लिखाण आहे. हे लिखाण वाचून त्यांच्याविषयी सर्वांनाच जवळीक वाटण्यास साहाय्य होईल आणि जगभरातील सर्वच साधकांना त्यांची तोंडओळख होईल. संतांची वैशिष्ट्ये केवळ वाचू नका, तर ती स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या लेखमालेचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल.’  – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांचा परिचय

पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांनी साधनेला आरंभ केल्यानंतर त्यांच्या गावात पारतखेडा (जिल्हा जळगाव) येथे त्यांनी सनातनच्या सत्संगाचा प्रसार केला. तसेच त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने यांचेही वितरण केले. जळगाव सेवाकेंद्रात जाऊन त्या सेवाही करायच्या. आता त्या समष्टीसाठी नामजप करतात.

पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांचा साधनाप्रवास पहाता ‘लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये संतत्वाचे गुण होतेच’, असे लक्षात येते, उदा. कुणी कसेही वागले, तरी मनात राग न रहाणे, प्रतिक्रिया न येणे, सर्वांविषयी प्रेम अन् आदरभाव असणे इत्यादी. या लेखावरून त्यांची उतारवयातही साधनेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेला अपार भाव लक्षात येतो. पू. आजींचा साधनाप्रवास आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. जन्म

सौ. वनिता पाटील

‘पू. (सौ.) आईंचा (सासूबाईंचा) जन्म पारतखेडा (ता. पारोळा, जि. जळगाव) येथे अत्यंत सधन कुटुंबात झाला. त्यांचे नाव ‘केवळबाई’ असून त्यांना सासरी आणि माहेरी ‘आक्काबाई’ या नावाने संबोधतात. त्यांच्या वडिलांचे नाव ‘विठ्ठल’ आणि आईचे नाव ‘लक्ष्मी’ होते.

२. वैवाहिक जीवन

२ अ. सासरच्या व्यक्तींची मने सांभाळणे : पू. आईंचे सासू-सासरे प्रेमळ होते; मात्र त्यांच्या २ नणंदा त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायच्या. त्या पू. आजींनी माहेरून आणलेल्या नवीन साड्या आणि पादत्राणे घेऊन जायच्या. पू. आजी नणंदांना स्वतःची पादत्राणे देऊन स्वतः शेतात अनवाणी जायच्या; पण तरी त्यांच्या मनात कुणाविषयीही राग नसे. त्या नातेवाइकांची मने सांभाळून रहात असत. कुणी कितीही वाईट वागले, तरी त्या प्रतिक्रिया व्यक्त करत नसत.

२ आ. मुलांवर चांगले संस्कार करणे : पू. आई नेहमी देवाला नैवेद्य दाखवल्यावरच जेवतात. त्या प्रत्येक शनिवारी मारुतीला तेल वहायच्या. त्या मुलांना देवपूजा करायला आणि शाळेत जातांना देवाला नमस्कार करून जायला सांगायच्या. गावातील कीर्तन सप्ताहात त्या मुलांना त्यांच्या समवेत घेऊन जायच्या, तसेच त्यांना गावातील मंदिरांची स्वच्छता करायला सांगायच्या. त्या मुलांना गोसेवा आणि प्राणिमात्रांवर प्रेम करायला सांगायच्या.

२ आ १. पू. आजींनी मुलांना दिलेली शिकवण

अ. खोटे बोलू नये. चोरी करू नये. तसे केल्यास देव शिक्षा करील. देवाला सर्व कळते. तो सर्व पहातो. कुणी कितीही वाईट वागले, तरी आपण तसे वागू नये. देव त्यांना शिक्षा करील. आपण शांत रहावे.

आ. आपल्या दाराशी कुणी आले, तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नये.

इ. काही विपरीत घडले, तरी देवाला कधीही दोष देऊ नये.

३. पू. आजींची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

३ अ. भूतदया : त्यांचे पशू, पक्षी आणि प्राणी यांच्यावर पुष्कळ प्रेम आहे. त्या शेतात चिमण्या आणि पाखरे यांच्यासाठी दाणे अन् पाणी ठेवायच्या.

३ अ १. पू. आजींमधील प्रेमभावामुळे प्राण्यांनी दिलेला प्रतिसाद

अ. आमच्याकडे मोठा नंदी (बैल) होता. तो पुष्कळ रागीट होता. तो कुणालाही जवळ येऊ देत नसे; मात्र पू. आजी त्याच्याजवळ गेल्यावर तो मान खाली घालायचा. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटायचे.

आ. आमच्याकडे ८ – १० गायी होत्या. पू. आईंनी गायींना हाक मारल्यानंतर त्या पू. आईंजवळ येत असत. पू. आई गावाला गेल्यावर एक गाय सतत हंबरत असे आणि चारा खात नसे. ती पू. आईंची वाट पहात असे. पू. आई लांबून येतांना दिसल्यावर ती लगेच पळत त्यांच्याजवळ जात असे.

इ. आमच्या शेतात जाण्याच्या मार्गावर एक कुत्रा होता. तो कुत्रा त्या मार्गाने कुणालाही जाऊ देत नसे. तो शेळी आणि लहान पिल्ले यांना पकडायचा, तसेच लहान मुलांना चावायचा; मात्र पू. आई तेथून जातांना तो दूर झाडाखाली जाऊन बसायचा. तो त्यांच्यावर कधीच भुंकला नाही किंवा त्यांना चावला नाही.

३ आ. सात्त्विक वृत्ती

१. पू. आई अग्निदेवतेला त्यांनी केलेल्या पहिल्या भाकरीचा नैवेद्य दाखवायच्या. त्या साधूंना शिधा द्यायच्या. त्या गायीची पूजा करून तिला भाकरी द्यायच्या.

२. त्या गावातील हरिनाम कीर्तन सप्ताहाला सर्व दिवस उपस्थित रहायच्या. त्या अशिक्षित होत्या; पण भजन, कीर्तन, पोथी इत्यादी ऐकून रामायण, महाभारत यांतील, तसेच संत तुकाराम, संत जनाबाई, संत मीराबाई, भक्त प्रल्हाद यांच्या गोष्टी सांगायच्या.

३. त्यांना पूर्वीपासूनच संत आणि साधक यांच्याप्रती अपार प्रेम वाटायचे.

३ इ. आज्ञापालन : वयाच्या ७० व्या वर्षापासून त्यांनी श्री गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) आज्ञापालनाला प्रारंभ केला. त्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘साधकांसाठीच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करतात. त्या नियमितपणे मीठ-पाण्याचे उपाय आणि बसून ७ – ८ घंटे नामजप करतात.

३ ई. सेवेची तळमळ : पू. आईंचे वय ७९ वर्षे आहे. या वयातही त्या नेहमी उत्साही असतात. आम्ही त्यांना सांगतो, ‘‘तुम्ही आमच्याकडे नंदुरबारलाच रहा.’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही गावात राहिल्यामुळे येथील लोकांना सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण करू शकतो. अंगात शक्ती असेपर्यंत सेवा करत रहायची.’’

३ उ. श्रद्धा

३ उ १. देवावरील श्रद्धा : वर्ष १९७२ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. शेतात काहीच पिकत नव्हते. भाकरीबरोबर खायला केवळ कोरडी मिरची पूड असायची; पण त्यांनी देवाला कधीच दोष दिला नाही. ‘कृष्ण माझी काळजी घेईल. तो मला एक दिवस या संकटातून बाहेर काढील’, असा त्यांची श्रद्धा होती.

३ उ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा : हिंदु राष्ट्र-जागृती सभा निर्विघ्नपणे पार पडावी’ आणि त्या ठिकाणी त्रास होत असलेल्या साधकांसाठी पू. आई नामजप करतात. त्या साधकांना सांगतात, ‘‘गुरुदेव सर्व करवून घेतील. काळजी करू नका. ते साक्षात् ईश्वर आहेत.’’

३ ऊ. भाव

१. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या कालावधीत ‘सभा निर्विघ्नपणे पार पडावी’, यासाठी त्या ८ – ९ घंटे नामजप करतात. तेव्हा त्यांचे पाय सुजतात, तरी त्यांना त्रास होत नाही. पायांना विभूती लावून घेतल्यावर ‘गुरुदेवांनी मला भले मोठे ‘टॉनिक’ दिले’, असे त्यांना वाटते.

२. आम्ही त्यांना विचारतो, ‘‘तुम्हाला साधनेत येऊन १४ वर्षे होत आहेत. ‘गुरुदेवांना भेटावे’, असे तुम्हाला वाटत नाही का ?’’ त्यावर त्या भावपूर्ण स्मितहास्य करून सांगतात, ‘‘ते (प.पू. गुरुदेव) सूक्ष्मातून सतत माझ्या समवेतच असतात, म्हणजे मीही त्यांच्याजवळच असते. आम्ही सतत भेटतो.’’

३. पू. आई पुष्पहार करून तो प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेला घालतात.

४. त्या सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात. त्या सर्व कृती गुरुदेवांना सूक्ष्मातून विचारून करतात.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले रुग्णाईत असतांना पू. आई त्यांच्यासाठी देवतांचा धावा करतात. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना बरे वाटावे’, यासाठी त्या ७ – ८ घंटे नामजप करतात.

६. ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीने साधकांची साधना वाढावी’, यासाठी त्या देवाला सतत प्रार्थना करतात.

४. पू. आजींना आलेली अनुभूती

‘त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे भगवान विष्णु, प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या रूपात दर्शन होते’, असे त्या सांगतात.’

(क्रमश:)

– सौ. वनिता पाटील (पू. आजींची सून), चाळीसगाव (जुलै २०१८)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/490964.html
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक