थकबाकीमुळे सोलापूर शहरातील ५ सहस्र ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित 

घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांकडे ६ कोटी ७० लाख रुपयांची थकबाकी

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – शहरातील घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांकडील ६ कोटी ७० लाख रुपयांच्या थकबाकीमुळे ५ सहस्र ३८५ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजदेयक वाढीव आल्याने अनेक ग्राहकांनी ‘महावितरण’कडे तक्रार करण्यास प्रारंभ केला आहे. महावितरणकडून प्रत्येक तक्रारीचे निवारण करून प्रत्येक ग्राहकाला अचूक देयक देण्यात येत असल्याचे महावितरणचे शहर अभियंता चंद्रकांत दिघे यांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे दळणवळण बंदी पुकारण्यात आली होती. त्यामुळे महावितरण आस्थापनाने एक मासाचे वीजदेयक घरपोच दिले नाही. त्यानंतर मात्र २ मासांचे एकत्रित देयक आल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला. वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करत असल्याचे आढळल्यास त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.