एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले यांच्याकडून क्रोएशिया येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. व्लादिमिर चिरकोव्हिच यांना शिकायला मिळालेली सूत्रे

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रो पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. आज आपण ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे सद्गुरु सिरियाक वाले यांच्याकडून श्री. व्लादिमिर चिरकोव्हिच यांना शिकायाला मिळालेली सूत्रे पाहूया.     

(भाग १)

सद्गुरु सिरियाक वाले यांचा जन्मदिनांक : २०.४.१९७१

वाढदिवस : चैत्र कृष्ण पक्ष दशमी (६ मे २०२१) या दिवशी वाढदिवस झाला.

साधकांनो, ‘सनातन’चे आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संत हे केवळ संत नाहीत, तर गुरुच असल्याने त्यांच्याकडून शिका अन् ते कृतीत आणून त्यांचा खर्‍या अर्थाने लाभ करून घ्या आणि साधनेत शीघ्र गतीने पुढे जा !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘आतापर्यंत सनातनचे आणि सनातनच्या शिकवणीप्रमाणे साधना करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे मिळून १११ साधक संत झाले आहेत. यांतील काहीजण ठिकठिकाणी जाऊन साधकांना साधनेसंदर्भात अगदी देहत्याग होईपर्यंत मार्गदर्शन करतात. आपण त्यांना ‘समष्टी संत’ म्हणतो. त्यांचे कार्य गुरूंप्रमाणेच साधनेत मार्गदर्शन करण्याचे आहे; म्हणून त्यांची माहिती सर्व साधकांना व्हावी आणि साधकांना संतांकडून काहीतरी शिकायला मिळावे, यासाठी त्यांच्याविषयीचे जागेनुसार काही लिखाण ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करत आहोत. त्या माहितीत काही संत आणि साधक यांनी लिहिलेली संतांची गुणवैशिष्ट्ये; शिकवण; त्यांच्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती; त्यांनी स्वतःविषयी, कुटुंबियांविषयी, इतर साधकांविषयी आणि संतांविषयी लिहिलेले लिखाण; त्यांनी केलेल्या कविता किंवा त्यांच्यावर इतर साधकांनी केलेल्या कविता इत्यादी विषयांवर लिखाण आहे. हे लिखाण वाचून त्यांच्याविषयी सर्वांनाच जवळीक वाटण्यास साहाय्य होईल आणि जगभरातील सर्वच साधकांना त्यांची तोंडओळख होईल. संतांची वैशिष्ट्ये केवळ वाचू नका, तर ती स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या लेखमालेचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले यांचा परिचय

सद्गुरु सिरियाक वाले फ्रान्स येथील असून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘मॉडेलिंग’ करत होते. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष १९९९ मध्ये त्यांनी साधना करण्यास आरंभ केला. वर्ष २००९ पासून ते पूर्णवेळ साधना करू लागले. मार्च २०१३ मध्ये त्यांनी संतपद प्राप्त केले आणि ऑगस्ट २०१८ मध्ये ते सद्गुरुपदी विराजमान झाले.

वर्ष २०१२ पासून ते एस्.एस्.आर्.एफ्.च्या अंतर्गत होत असलेल्या कार्याचे, उदा. सत्संग, कार्यशाळा, प्रवचने यांद्वारे होणार्‍या अध्यात्मप्रचाराचे दायित्व पाहू लागले. त्यांच्यात मानवाच्या आध्यात्मिक प्रगतीची तीव्र तळमळ आहे. जगात ‘कोरोना विषाणू’मुळे महामारी चालू असतांनाही त्यांनी मार्च २०२० पासून ‘कॅराव्हॅन’मध्ये (सर्व सुविधा असलेल्या मोठ्या वाहनामध्ये) वास्तव्य करून जर्मनी येथून ‘ऑनलाईन’ प्रवचने घेतली. दळणवळण बंदीच्या या काळात बंदीच्या संदर्भातील सर्व नियम पाळून त्यांनी ‘कॅराव्हॅन’मधून प्रवास करत युरोपमध्ये अध्यात्मप्रसाराचे कार्यही केले. साधक आणि जिज्ञासू यांना मार्गदर्शन करणे, तसेच विविध ठिकाणी प्रवचने घेणे, यांची एकही संधी त्यांनी सोडली नाही.

त्यांच्यातील या तळमळीमुळेच ‘कोरोना’ महामारीच्या काळातही अध्यात्माचा प्रसार करणार्‍या जगातील काही मोजक्या आध्यात्मिक मार्गदर्शकांपैकी ते एक ‘मार्गदर्शक’ ठरले आहेत.

‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेने दाओस (क्रोएशिया) येथे एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने २ कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी जवळजवळ ३ आठवडे मला सद्गुरु सिरियाकदादांच्या समवेत रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी सद्गुरु सिरियाकदादांकडून बरीच सूत्रे शिकायला मिळाली. ती पुढे दिली आहेत.

श्री. व्लादिमिर चिरकोव्हिच

१. परिस्थिती प्रतिकूल असूनही साधनेत सातत्य, तत्परता आणि गुरुसेवेची तळमळ टिकवून वेगाने आध्यात्मिक प्रगती करणारे सद्गुरु सिरियाक वाले !

वर्ष २००३ पासून, म्हणजे माझ्या साधनेला आरंभ झाल्यापासून सद्गुरु सिरियाक वाले यांच्याशी माझा परिचय आहे. आम्ही साधनेच्या संदर्भात एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे मला त्यांच्या जीवनातील चढ – उतार ठाऊक आहेत. साधनेविषयी त्यांना जे जे मार्गदर्शन मिळत गेले, ते ते त्यांनी त्वरित कृतीत आणले, हे त्यांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरीही त्यांनी साधनेतील सातत्य, तत्परता आणि गुरुसेवेची तळमळ यांच्याकडे कधीच कानाडोळा केला नाही. सद्गुरु सिरियाकदादा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करण्यास गेल्यावर आमचा एकमेकांशी संपर्क अल्प झाला. मी वर्षातून एकदा एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने घेणार्‍या शिबिरासाठी रामनाथी आश्रमात येत असे. तेव्हा त्यांची आध्यात्मिक प्रगती वेगाने होत असल्याचे मला जाणवत असे.

२. केवळ तन, मन, धन आणि बुद्धीच नव्हे, तर संपूर्ण जीवन गुरुचरणी समर्पित करणे

सद्गुरु सिरियाकदादा साधना करतांना स्वतः अध्यात्म जगले आहेत आणि त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी पूरक अशा पुष्कळ अनुभूती घेतल्या आहेत. ‘ते साधनेत ज्याप्रमाणे मार्गक्रमण करत आहेत, तसेच त्यांनी स्वतःचे केवळ तन, मन, धन आणि बुद्धीच नव्हे, तर संपूर्ण जीवन गुरुचरणी समर्पित केले आहे. त्यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्याप्रमाणे आपणही कृती किंवा आचरण केल्यास आम्हा साधकांचीही निश्चित आध्यात्मिक प्रगती होईल’, असे मला वाटते.

३. वेळेचा अपव्यय न करता २४ घंटे सहजतेने साधना करणे

सद्गुरु सिरियाकदादा वेळेचा अपव्यय न करता २४ घंटे सहजतेने साधना करत असतात. ते भ्रमणभाषद्वारे साधकांच्या समवेत सत्संगात असतांना वस्तूंवरील धूळ पुसणे, लादी पुसणे, वस्तू व्यवस्थित ठेवणे इत्यादी कार्ये हातासरशी तत्परतेने करतात. ते एकाच वेळी एकापेक्षा अधिक कार्ये करत असले, तरी त्यांचे सगळीकडे सारखेच लक्ष असते. हे सर्व ते अगदी सहजतेने करतात. यातून ‘माझ्यातील कार्यक्षमता वृद्धींगत करून वेळेचा सदुपयोग कसा करू शकतो ?’, हे मला शिकायला मिळाले. एकाच वेळी अनेक सेवा करण्याची ही शैली आपण आत्मसात केली, तर ‘आपल्याकडे पुष्कळ वेळ आहे’, हे आपल्या लक्षात येईल आणि ‘मला वेळ नाही’, हे कारण आपण कधीही सांगणार नाही.

४. सद्गुरु सिरियाकदादांमध्ये परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणे विनोदबुद्धी असल्याचे जाणवणे आणि त्यांच्या सान्निध्यात आनंदाची अनुभूती येणे

सद्गुरु सिरियाकदादांकडे विविध सेवांचे दायित्व असल्यामुळे ते पुष्कळ व्यस्त असतात, तरीही ते सहजपणे साधकांच्या समवेत वेळ व्यतीत करतात. त्यांच्या वागण्या – बोलण्यातून ‘माझ्याकडे वेळ नाही’, असे कधीच जाणवत नाही. परात्पर गुरुदेवांप्रमाणे त्यांच्यातही विनोदबुद्धी असल्याने त्या दोघांमधील एकरूपतेची जाणीव होते. त्यामुळे सद्गुरु सिरियाकदादांच्या सान्निध्यात आनंदाची अनुभूती येते. साधकांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाल्यावर सद्गुरु सिरियाकदादांच्या केवळ उपस्थितीने विचारांत पुन्हा सुस्पष्टता येते आणि प्रसन्न वाटते. त्यांच्याकडे पाहिल्यावर मला परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण येते. सूर्यासमान असणार्‍या परात्पर गुरुदेवांतील चैतन्यामुळे साधकरूपी सूर्यफुले आनंदाने आपोआपच त्यांच्याकडे वळतात. त्यांच्याप्रमाणेच आपल्यालाही ठिकठिकाणी आनंद प्रसारित करता आला पाहिजे. त्यासाठी ‘आपल्यातील अहं निर्मूलन करणे आणि भक्तीभाव वाढवणे आवश्यक आहे’, हे मला शिकायला मिळाले.

५. सतत ईश्वराच्या अनुसंधानात राहिल्याने साक्षीभावाच्या टप्प्याला जाऊन स्वत्व विसरणे

सद्गुरु सिरियाकदादा सतत ईश्वराच्या अनुसंधानात असतात. ते साधकांच्या समवेत असतांना पुष्कळ वेळा साक्षीभावात असतात. ते ‘देहाने जरी तेथे उपस्थित असले, तरी मनाने तेथे नाहीत’, असे जाणवते. त्यांच्या समवेत कुणी संवाद साधल्यासच ते प्रतिसाद देतात. काही वेळा ते एखाद्या ठिकाणी अनुपस्थित असतील, तरीही त्यांचे अस्तित्व जाणवते, तर काही वेळा त्यांची उपस्थिती कुणाच्या लक्षातही येत नाही. ‘आपण सातत्याने ईश्वराच्या अनुसंधानात राहिल्यावर ईश्वरच सर्वकाही करतो आणि आपल्यातील ‘मी’चे काहीच अस्तित्व उरत नाही’, हे मला शिकायला मिळाले.

६. सद्गुरु सिरियाकदादा यांची देहबुद्धी अल्प असल्यामुळे शारीरिक व्याधींचा दिखाऊपणा न करणे आणि स्वतःला वेदना होत असतांनाही इतरांना आध्यात्मिक साहाय्य करणे

सद्गुरु सिरियाकदादा त्यांच्या शारीरिक त्रासांचा किंवा वेदनांचा दिखाऊपणा न करता सेवा करतात. त्यांच्यात देहबुद्धी अल्प आहे. एकदा त्यांना वेदनेमुळे २० ते ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ एका ठिकाणी बसणे कठीण जात होते, तरीही त्यांच्या मुखावर वेदनांचा लवलेशही नव्हता. पुढील उदाहरणांवरून ते लक्षात येईल.

अ. एक दिवस सद्गुरु सिरियाकदादांना पुष्कळ वेदना होत असल्यामुळे ते घराबाहेरील ‘कॅराव्हॅन’मध्ये जाऊन झोपले होते. घरातील एका साधिकेला आध्यात्मिक त्रास होत होता. त्या वेळी सद्गुरु सिरियाकदादा घरात आले आणि नामजपादी उपाय करण्याविषयी मार्गदर्शन करून पुन्हा ‘कॅराव्हॅन’मध्ये जाऊन झोपले. काही वेळाने त्या साधिकेच्या आध्यात्मिक त्रासात वाढ झाली. सद्गुरु सिरियाकदादांना ते समजल्यावर तत्परतेने येऊन त्यांनी साधिकेसाठी नामजपादी उपाय केले.

(क्रमश:)

– श्री. व्लादिमिर चिरकोव्हिच, क्रोएशिया (९.९.२०२०)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/490544.html
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक