विकासाच्या नावाखाली सिंहगडाची जी स्थिती झाली तीच राजगडाची होऊ शकते. गडाचे पावित्र्य भंग करणार्यांची संख्याही अल्प नाही. गडांचे जतन आणि संवर्धन करून त्यांची पडझड थांबवणे, गडाचे गडपण शाबूत ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे !
पुणे, २४ जून – जागतिक वारसा स्थळासाठी ‘युनेस्को’ला पाठवलेल्या १४ किल्ल्यांच्या सूचीमध्ये राजगडाचा समावेश आहे. ‘राजगड किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या तसेच भौगोलिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. ‘रोप वे’मुळे गडाचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होणार आहे. राजगडाचे संवर्धन करण्याऐवजी त्याचे ‘रोप वे’च्या माध्यमातून पर्यटनस्थळ करण्याचा निर्णय सरकारने रहित करावा, अशी मागणी ‘गड किल्ले संवर्धन समिती’चे अध्यक्ष प्रसाद दांगट यांनी केली आहे. ‘रोप वे’मुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नांवर पाणी फिरण्याची शक्यता असल्याचे मत दांगट यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
प्रसाद दांगट यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे
१. ‘गडाभोवताली असलेली झाडी राखावी, येथील नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करावे’, असे महाराजांचे आज्ञापत्र उपलब्ध आहे; पण याकडे दुर्लक्ष करून ‘रोप वे’चा निर्णय घेण्यात आला आहे.
२. मूळ बांधणीनुसार किल्ल्यावर ३०० माणसे थांबण्याची क्षमता आहे; मात्र कोणत्याही सुविधा नसतांना सुट्टीच्या दिवशी आत्ताच गडावर १ सहस्र ते दीड सहस्र पर्यटक येतात. ‘रोप-वे’मुळे या संख्येमध्ये पाच पट वाढ होणार आहे.
३. राजगड आणि त्याला जोडणारा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. अनेक दुर्मीळ, प्रदेशनिष्ठ वनस्पती, वन्य प्राणी, दीडशेहून अधिक प्रकारचे पक्षी, वीसहून अधिक जातीचे साप आणि बेडूक, पन्नास प्रकारच्या फुलपाखरांची या भागात नोंद झाली आहे. किल्ल्याच्या तटबंदीमध्ये नुकत्याच एका प्रदेशनिष्ठ पालीच्या प्रजातीचा शोध लागला आहे. ‘रोप वे’मुळे या वन्यप्राण्यांच्या हालचालींवर मर्यादा येणार आहेत.
४. पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी किल्ल्याला वेठीस धरू नये. गावाला रोजगार देण्यासाठी शेतीशी जोड उपक्रम, औषधी वनस्पतींची लागवड, कृषी पर्यटनासह इतर अनेक उपक्रम राबवता येऊ शकतात.