१. सौ. माला कुमार, देहली
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु पिंगळेकाका घरी आल्यामुळे त्यांच्या रूपात परात्पर गुरु डॉक्टरच घरी आल्याचे जाणवणे : ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आमच्या घरीच होत्या आणि गुरुपौर्णिमेच्या एक दिवस आधी सद्गुरु पिंगळेकाकासुद्धा घरी आले. त्या वेळी दोन्ही सद्गुरूंना पाहून असे जाणवले, ‘जणू गुरुपौर्णिमा उद्या नसून आजच आहे आणि या दोघांच्या रूपात साक्षात् परात्पर गुरु डॉक्टरच घरी आले आहेत.’ त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला.’
२. कु. मनीषा माहुर, देहली
गुरुपूजनानंतर वातावरणात गारवा निर्माण होऊन व्यासपिठावर एका कडेला असलेले डास आपोआप निघून जाणे : ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडे सूत्रसंचालनाची सेवा होती. गुरुपूजनाच्या वेळी मला व्यासपिठावर एका बाजूला बसायचे होते. तिथे पुष्कळ डास होते आणि पंखाही नव्हता. सनातनच्या गुरुपरंपरेच्या (श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद महाराज, श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे गुरुबंधू प.पू. रामानंद महाराज, प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य डॉ. जयंत बाळाजी आठवले ही सनातनची गुरुपरंपरा आहे.) पूजनाला आरंभ झाल्यानंतर थोड्याच वेळाने गारवा जाणवू लागला आणि तेथील डास आपोआप निघून गेले. ‘गुरुपरंपरेचे पूजन झाल्यावर त्यातील चैतन्यामुळे हे घडले’, असे मला जाणवले आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
३. सौ. ममता गुप्ता, नोएडा
३ अ. गुरुपरंपरेचे पूजन करतांना आज्ञाचक्रावर कंपने जाणवणे : ‘मला गुरुपरंपरेचे पूजन करण्याची सेवा मिळाली होती. गुरुपूजन करतांना आणि प्रवचन ऐकतांना माझ्या आज्ञाचक्रावर कंपने जाणवून मला चांगले वाटत होते आणि ‘याच स्थितीत रहावे’, असे वाटत होते. मागील २ – ३ वर्षांपासून मी घरात नामजप करतांना किंवा आमच्या दुकानात काम करतांना मला अशीच अनुभूती येते.
३ आ. सेवा करतांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांच्या बोटांच्या नखात जाऊन बसले आहे आणि चारही बाजूंनी संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असा भाव ठेवल्यावर शारीरिक त्रास न्यून होणे : मागील २ – ३ वर्षांपासून उष्णतेमुळे माझ्या अंगावर पुरळ येतात. त्यासाठी मला प्रतिदिन औषध घ्यावे लागते. या वर्षी गुरुपौर्णिमेला निधीसंकलन करतांना ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांच्या बोटांच्या नखात जाऊन बसले आहे आणि माझ्या चारही बाजूंनी संरक्षक कवच निर्माण झाले आहे’, असा भाव मी ठेवला होता. त्या वेळी ‘माझा उष्णतेचा शारीरिक त्रास न्यून झाला असून मला प्रतिदिन औषधही घ्यावे लागले नाही’, असे माझ्या लक्षात आले. गुरुपौर्णिमेनंतर मला पुष्कळच बरे वाटले.’
४. सौ. मोहिनी कुलकर्णी, नोएडा
व्यासपिठाच्या खाली रांगोळीजवळ अकस्मात् मुंग्या येणे आणि त्यावर विभूती घातल्यावर ५ मिनिटांतच त्या नाहीशा होणे : ‘गुरुपूजनानंतर दुपारी सर्व साधक सेवा करत होते. तेव्हा व्यासपिठाच्या खाली आणि रांगोळीजवळ अकस्मात् पुष्कळ मुंग्या आल्याचे मला दिसले. ‘त्यावर गोमूत्र शिंपडूया’, असा विचार माझ्या मनात आला; परंतु मी गोमूत्र शिंपडले नाही. काही वेळाने एका साधिकेने गुरुपूजनातील विभूती मुंग्यांवर घातल्यावर ५ मिनिटांत सर्व मुंग्या नाहीशा झाल्या.’
(डिसेंबर २०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |