४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
पुणे, २२ जून – परकीय चलन अपव्यवहार प्रकरणात येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, तसेच त्यांचे कुटुंबीय यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता २१ जून या दिवशी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. ही सर्व मालमत्ता समभागांच्या रूपात आहे. भोसले यांच्यावर ‘फेमा’(फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट १९९९) कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून सप्टेंबर २०१७ पासून त्यांची चौकशी चालू होती. भोसले कुटुंबियांची पुणे, नागपूर, गोवा या परिसरांत तारांकित हॉटेल्स आहेत. तसेच दुबईतील एका आस्थापनात भोसले यांची गुंतवणूकही आहे. परदेशातील अधिकोषांमध्ये त्यांची खाती आहेत.
अविनाश भोसले आणि त्यांचे कुटुंबीय यांनी दुबईच्या रोचडेल असोसिएट्स लिमिटेडमधील समभागांच्या बदल्यात ४०.३४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता दुबईत खरेदी केली. हा व्यवहार करतांना परकीय चलन व्यवस्थापन कायदा अर्थात ‘फेमा’चे उल्लंघन केले. या कायद्यानुसार परदेशातील मालमत्तेइतकी संपत्ती भारतात जप्त केली जाते. त्याखेरीज त्यांच्या आणि कुटुंबियांच्या नावे विविध अधिकोष खात्यांमध्ये असलेली १.१५ कोटी रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. ईडीने भोसले यांच्या गणेशखिंड रस्त्यावरील कार्यालयातही काही मासांपूर्वी कारवाई केली होती.
भोसले यांच्यावर ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत कारवाई करीत १ कोटी ८३ लाख रुपयांचा दंड केला होता. वर्ष २००७ मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करून भारतात येतांना परकीय चलन आणि महागड्या वस्तू सीमा शुल्क न भरता चोरून आणल्याविषयी ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचे पारपत्रही जप्त करण्यात आले होते. यापूर्वी त्यांची मुंबईत चौकशी चालू होती.
कोट्यवधी रुपयांच्या ए.बी.आय.एल्. ग्रुपचे ते मालक आहेत. काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. व्यवसायासह राजकीय नेत्यांसमवेतच्या संबंधांमुळेही भोसले चर्चेत असतात.