अचानक कामावरून काढून वेतनकपात केल्याचा परिणाम
ठाणे, २० जून (वार्ता.) – येथील महानगरपालिकेच्या ग्लोबल कोविड रुग्णालयातील २०० परिचारिका आणि ५० आधुनिक वैद्य यांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले आहे, तसेच त्यांचे वेतनही न्यून करण्यात आले आहे. यासंदर्भातील नोटीस १८ जूनच्या मध्यरात्री संबंधित संस्थेने रुग्णालयाच्या गटावर टाकली. त्यामुळे संतप्त परिचारिका आणि आधुनिक वैद्य यांनी १९ जूनला रुग्णालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करून काम बंद केले. ‘ग्लोबल’ या कोविड रुग्णालयामध्ये प्रारंभी मोठ्या प्रमाणात ओम साई प्रा.लि. या आस्थापनाच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने परिचारिका आणि आधुनिक वैद्य यांची भरती करण्यात आली. ठाणे येथे कोरोनाचे रुग्ण न्यून झाले आहेत, तसेच रुग्णालयातही रुग्णांची संख्या न्यून झाली आहे; मात्र अद्याप सर्व परिचारिका आणि आधुनिक वैद्य त्यांची सेवा बजावत आहेत.