षट् संपत्ती

अध्यात्मविषयक बोधप्रद ज्ञानामृत…

 ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

पू. अनंत आठवले

प्रश्‍न : (ठाणे येथील एका जिज्ञासूचा प्रश्‍न) ज्ञानसाधनेमध्ये ‘शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान’ अशी षट् संपत्ती आवश्यक सांगितली आहे. ह्या शब्दांचा नेमका अर्थ काय ?

उत्तर : चांगला प्रश्‍न विचारलात. शब्दांचे अर्थ तर शब्दकोशातही मिळतात, तरीसुद्धा तुम्हाला ह्या शब्दांचा अर्थ विचारून घ्यावासा वाटला, ह्यावरून ‘तुम्ही सखोल चिंतन करता’, हे लक्षात येते. त्यामुळे आनंद वाटला. बहुतेक वेळा एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. अध्यात्मशास्त्रात शब्दांचा नेमका अर्थ जाणणे आवश्यक असते. हे पुढे दिलेल्या, विशेषतः उपरती, श्रद्धा आणि समाधान ह्या शब्दांच्या अर्थांवरून लक्षात येईल. यांचे अर्थ पुढे दिले आहेत.

१. शम : मनोनिग्रह. काम, क्रोध इत्यादी विकारांवर नियंत्रण

२. दम : इंद्रियनिग्रह. इंद्रियांना विषयांच्या भोगांकडे जाऊ न देता नियंत्रणात ठेवणे

३. उपरती : निवृत्ती. वैराग्य. चित्तवृत्तींचे व्यवहारांतील कर्मांपासून, संसारापासून परावृत्त होणे

४. तितिक्षा : सुख-दुःख, शीत-उष्ण, मान-अपमान इत्यादी द्वंद्वांविषयी सहनशीलता

५. श्रद्धा : शास्त्र, संत आणि गुरु ह्यांच्या वचनांवर, ते जे सांगतात, त्यावर पूर्ण विश्‍वास

६. समाधान : शंकांचे निरसन. अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करतांना नाना प्रकारचे विकल्प आणि शंका मनात येतात. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून सर्व शंकांचे निरसन झाले की, प्राप्त होणारी शांती !

– अनंत आठवले (२३.१.२०२१)

(संदर्भ : लवकरच प्रकाशित होणारा ग्रंथ)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥