उत्तर कोरियामध्ये अन्नटंचाई निर्माण होण्याची शक्यता

नागरिकांना सतर्क रहाण्याचा हुकूमशाह किम जोंग उन यांचा आदेश !

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन (मध्यभागी)

प्यांगयांग (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियामध्ये अन्नटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. देशाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी नागरिकांना याविषयी सतर्क रहाण्याचा आदेश दिला आहे. त्यांनी कृषी अधिकार्‍यांना अन्नधान्यांचे उत्पादन वाढवण्याच्या नव्या पद्धती शोधण्याचाही आदेश दिला आहे. उत्तर कोरियामध्ये गेल्या काही मासांमध्ये वादळ आणि पूर यांमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. उत्तर कोरियामध्ये यापूर्वी १९९० च्या दशकामध्ये अन्नटंचाई निर्माण झाली होती. त्या वेळी झालेल्या कुपोषणामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. तज्ञांच्या मते उत्तर कोरियाला १० लाख टन अन्नधान्याची आवश्यकता आहे.